गुड न्यूज ….मान्सून दोन दिवसांत अंदमान-निकोबार बेटांवर दाखल होणार | पुढारी

गुड न्यूज ....मान्सून दोन दिवसांत अंदमान-निकोबार बेटांवर दाखल होणार

पुणे, पुढारी वृत्तसेवा: हवेचा वाढलेला दाब, बाष्पीभवनाची वाढलेली प्रकिया, तसेच अनुकूल वातावरण यामुळे मान्सून अंदमान-निकोबार बेटांसह बंगालच्या उपसागरातील दक्षिण भागात येत्या दोन दिवसांत दाखल होणार आहे, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे.

सध्या देशात उष्णतेची लाट तीव्र आहे. उत्तर भारतासह दक्षिण भारतात गेल्या काही दिवसांपासून कमाल तापमानाचा पारा 40 ते 45 अंशांच्या आसपास आहे. या उष्णतेच्या तीव्र लाटेमुळे नागरिकांच्या अंगाची लाही-लाही होत आहे. अशीच स्थिती बंगालच्या उपसागरासह अंदमान-निकोबार बेटांवर तयार झाली आहे. मान्सूनच्या आगमनासाठी आवश्यक असलेले अनुकूल वातावरण म्हणजेच बंगालच्या उपसागरात एक हजार हेक्टा पास्कल हवेचा दाब तयार झाला आहे. तसेच हवेचा कमी दाब असताे तिकडे वारे मोठ्या प्रमाणावर बाष्प वाहून नेतात. अशीच क्रिया सध्या बंगालच्या उपसागरात सुरू झाली आहे. तसेच, हिंदी महासागरात हवेचा दाब जास्त वाढला आहे. या दोन्ही प्रक्रियांमुळे मान्सूनच्या हालचाली वाढण्यास अनुकूल वातावरण तयार झाले आहे. या परिणामामुळे बंगालच्या उपसागरातील दक्षिण भागासह दक्षिण अंदमान-निकोबार बेटांवर मान्सून दाखल होण्यास अनुकूल वातावरण तयार झाले आहे.

…तर केरळमध्येही लवकरच

वास्तविक पाहता बंगालच्या उपसागरासह अंदमान आणि निकोबार बेटांबर 18 ते 22 मेच्या आसपास मान्सून दाखल होत असतो. मात्र, या वर्षी एक ते दोन दिवस आधीच तेथे मान्सून दाखल होणार आहे. अनुकूल वातावरण असेच राहिले, तर केरळमध्येदेखील मान्सून वेळेत किंवा वेळेच्या आधी दाखल होण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

अनुकूल वातावरण

सध्या आंध्र प्रदेश ते दक्षिण तमिळनाडू या भागात द्रोणीय स्थिती तयार झाली आहे. तसेच विखंडित वारेदेखील जोरदार वाहत आहेत. याशिवाय उष्णतेची लाट तीव्र आहे. यामधून बाष्प खेचले जाऊन ते बंगालच्या उपसागराकडे जात आहे. या परिणामामुळे मान्सूनचे आगमन लवकर होण्यास अनुकूल वातावरण तयार झाले आहे.

 

Back to top button