‘land for jobs’ घोटाळा प्रकरणी राबडी देवी ‘ईडी’समोर हजर | पुढारी

'land for jobs' घोटाळा प्रकरणी राबडी देवी 'ईडी'समोर हजर

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : ‘land for jobs’ घोटाळा प्रकरणी बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी ईडी समोर आज हजर झाल्या आहेत. दिल्ली येथील ईडीच्या (अंमलबजावणी संचलनालय) कार्यालयात राबडी देवी पोहोचल्या आहेत. लालू प्रसाद रेल्वे मंत्री असताना त्यांच्या काळात जमीन घेऊन त्याबदल्यात रेल्वेत नियमबाह्य नियुक्त्या केल्याचा आरोप आहे. याप्रकरणात राबडी देवी यांच्यासह लालू प्रसाद यादव तसेच त्यांच्या अन्य कुटुंबीयांवर देखील आरोप ठेवण्यात आले आहे. नुकतेच सीबीआय आणि ईडी दोन्हींकडून या प्रकरणांचा तपास होत आहे.

या प्रकरणी आज ( दि. १६) केंद्रीय अन्‍वेषण विभागाने (सीबीआय) पाटणा, दिल्‍ली आणि ग्रुरुग्रामसह ९ ठिकाणी छापे टाकले होते. यामध्‍ये बिहारचे माजी मंत्री प्रेमचंद गुप्‍ता यांच्‍या निवासस्‍थानाचाही समावेश होता. त्‍याचबरोबर राष्‍ट्रीय जनता दलाच्‍या (आरजेडी)आमदार किरण देवी यांच्‍या पटना आणि आरा येथील निवासस्‍थानी सीबीआयने कारवाई केली. किरण देवी या माजी आमदार अरुण यादव यांच्‍या पत्‍नी असून, अरुण यादव हे ‘आरजेडी’ अध्‍यक्ष लालू प्रसाद यादव यांचे निकटवर्ती मानले जातात. (Land for job case)

‘land for job’ जमिनीच्या बदल्यात रेल्वेत सरकारी नोकरी हा २००४ ते २००९ या काळातील घोटाळा आहे. तत्‍कालीन रेल्‍वे मंत्री लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबीयांना कथितपणे भेटवस्तू किंवा विकल्या गेलेल्या जमिनीच्या बदल्यात रेल्वेमध्ये नोकरी दिल्‍या, असा आरोप आहे. या घोटाळ्याचा तपास सीबीआय करत आहे. या प्रकरणी सीबीआयने दाखल केलेल्‍या आरोपपत्रात म्हटले आहे की, भारतीय रेल्वेच्या नियमांचे आणि प्रक्रियेचे उल्लंघन करून रेल्वेमध्ये नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

‘ईडी’ने मार्च महिन्‍यात बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या दिल्लीतील निवासस्थानावरही छापे टाकले होते. ही कारवाई राजकीय आकसातून करण्‍यात आल्‍याचा आरोप आरजेडीच्‍या वतीने करण्‍यात आला होता.

या प्रकरणी सक्‍तवसुली संचालनालयाने ( ईडी) एक निवेदन जारी केले होते. यामध्‍ये म्‍हटलं होतं की, लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबीयांनी रेल्वेमंत्री असताना नोकरीच्या बदल्यात जमीन घेतल्‍या. या जमिनीची किंमत सध्या सुमारे २०० कोटी रुपये इतकी आहे. तसेच लालू प्रसाद यांच्या कुटुंबावर भ्रष्टाचाराचा आरोप करणाऱ्या इतर मालमत्तेची यादीही जारी केली होती. ही संपत्तीही यादव कुटुंबाने नोकरीच्या बदल्यात जमीन घोटाळ्यातून मिळवल्याचेही म्‍हटले होते.

‘जमिनीच्‍या बदल्यात नाेकरी’ घोटाळा प्रकरण : ‘सीबीआय’चे ९ ठिकाणी छापे

Land For Job Scam : ‘लॅंड फाॅर जाॅब’ घोटाळा प्रकरणाची सुनावणी मे महिन्यापर्यंत पुढे ढकलली

Back to top button