काश्मिरातून परप्रांतीय मजुरांचे स्थलांतर

काश्मिरातून परप्रांतीय मजुरांचे स्थलांतर

जम्मू ; अनिल साक्षी : काश्मीर खोर्‍यात गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या दहशतवादी हत्यासत्राच्या भीतीने काश्मीर खोर्‍यातील परप्रांतीय मजूर हादरून गेले आहेत. पोलिसांकडून आश्रय आणि सुरक्षितता मिळत नसल्याने परप्रांतीय मजूर भीतीमुळे आता आपल्या घरी परतू लागले आहेत. त्यामुळे जम्मूतील रेल्वे स्थानकावर परप्रांतीय मजुरांची झुंबड उडाली आहे.

श्रीनगरहून जम्मूत पोहोचलेल्या छत्तीसगडच्या अजित साहू यांनी सांगितले, मी काश्मीरमध्ये वीटभट्टीवर काम करत होतो. पत्नी आणि दोन लहान मुलांसह तेथे मी राहात होतो. दोन बिहारी तरुणांची हत्या झाल्याची माहिती समजल्यानंतर मी कुटुंबासह काश्मीर सोडण्याचा निर्णय घेतला. वीटभट्टी मालकाने सुरक्षेची हमी दिली होती.

मात्र काश्मीर खोरे सोडण्याचा मी निर्णय घेतला. दरम्यान, काश्मीर खोर्‍यात तीन लाखांपेक्षा अधिक परप्रांतीय मजूर कामानिमित्त आले आहेत. बागकाम, शेतमजूर, पाणीपुरी विक्री, कलईसह अन्य काम हे मजूर करतात. परप्रांतीय मजुरांवर बहुतांश काश्मीर नागरिक अवलंबून आहेत.

बारामुल्लाहून आपल्या घरी परतणार्‍या नागरिकांच्या म्हणण्यानुसार काश्मीर खोर्‍यातील परिस्थिती सुधारेल, अशी आमची अपेक्षा होती. मात्र मजुरांच्या होत असलेल्या हत्यांमुळे आम्ही भीतीच्या छायेखाली आहोत. दरम्यान, काश्मीर खोर्‍यात दहशतवादी कारवाईमुळे भीतीच्या छायेखाली असलेल्या परप्रांतीय मजुरांना पोलीस आणि लष्कराच्या छावण्यांमध्ये आसरा घेण्याचा सल्ला दिला असल्याच्या बातम्या खोट्या असल्याचे काश्मीरचे पोलीस महासंचालक विजय कुमार यांनी सोमवारी सांगितले.

काश्मिरात अनिश्चित काळासाठी इंटरनेट बंद

गेल्या काही दिवसांपासून दहशतवाद्यांकडून होत असलेल्या निरपराध लोकांच्या हत्यासत्रावरून काश्मीर खोर्‍यात परिस्थिती फारच चिघळली आहे. त्यामुळे सरकारकडून कठोर पावले उचलण्यास सुरुवात झाली आहे. काश्मीर खोर्‍यातील अनेक भागात अनिश्चित काळासाठी सरकारने इंटरनेट सेवा वापरास बंदी घातली आहे. एवढेच नाही तर 30 वर्षांनंतर पहिल्यांदाच श्रीनगरमधील लाल चौकात महिलांचा तपासणी केली जात आहे.

* हत्यासत्रामुळे मजूर भीतीच्या छायेखाली
* पैशापेक्षा जीव महत्त्वाचा असल्याचे मजुरांचे मत
* मरण्यापेक्षा आपल्या घरी परतणे चांगले
* जबाबदारी टाळली नसल्याचा पोलिसांचा दावा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news