पश्चिम बंगालमधील पूर्व मेदिनीपूरमध्ये फटाका कारखान्यात स्फोट, तीन ठार; भाजपने केली 'एनआयए' तपासाची मागणी

पुढारी ऑनलाईन डेस्क : पश्चिम बंगालमधील पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यात आज फटाक्याच्या कारखान्यात स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की, त्यात तिघांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात चार जण गंभीर जखमी झाले आहेत. मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले असून, या स्फोटाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.
एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील इग्रा परिसरात हा फटाका कारखाना होता. तो बेकायदेशीर होता. स्फोटाचा धक्का इतका जोरदार होता की निवासी इमारतीत सुरू असलेला कारखाना कोसळला. घटनास्थळी स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक मदतकार्य करत आहे. या स्फोटात तीन जण ठार तर चार जण जखमी झाले आहेत.
भाजपने केली ‘एनआयए’ तपासाची मागणी
दरम्यान, पश्चिम बंगाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुकांत मजुमदार यांनी या संपूर्ण घटनेची राष्ट्रीय तपास संस्थेकडून ( एनआयए ) चौकशीची मागणी केली आहे. याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहिणार असल्याचे त्यांनी सांगितले. ममता सरकारने संपूर्ण राज्याला बॉम्ब आणि बंदूक बनविण्याच्या कारखान्यात रूपांतरित केले आहे, असा आरोपही त्यांनी केला.
Three killed, four injured in explosion at Egra in West Bengal’s Purba Medinipur district: Police
— Press Trust of India (@PTI_News) May 16, 2023