हरियाणात आता कार्यालयात मद्यप्राशन करण्याची परवानगी

गुरुग्राम; वृत्तसंस्था : मद्यप्राशन करीत कार्यालयात काम करण्याची कल्पना आता प्रत्यक्षात उतरणार आहे. हरियाणातील भाजप सरकारने नवे मद्य धोरण जाहीर केले असून त्यानुसार आता कॉर्पोरेट ऑफिसमध्ये मद्यविक्री व प्राशनास मंजुरी देण्यात आली आहे. हरियाणा सरकारने जारी केलेल्या धोरणानुसार आता कार्यालयात मद्यप्राशनाची परवानगी देण्यात आली आहे. यासाठी सरकारने जारी केलेल्या अटी पाहता मोजक्याच आस्थापनांना ही सुविधा घेता येईल.
एक लाख चौरस फुटांची बंदिस्त जागा असणाऱ्या आणि किमान पाच हजार कर्मचारी असणाऱ्या कंपन्यांना यासाठी परवाना मिळेल. या कंपन्यांचे कॅन्टीन किमान दोन हजार चौरस फुटांचे असणे बंधनकारक आहे. या परवान्यानुसार कॉर्पोरेट कंपन्यांना फक्त माईल्ड बीअर आणि वाईन हेच मद्य ठेवता येणार आहे. तसेच ही सुविधा एसईझेड आणि आयटी पार्कमधील कंपन्यांना लागू नसेल. हा परवाना मिळवण्यासाठी दरवर्षी दहा लाख रुपयांचे शुल्क राहणार असून सुरक्षा अनामत म्हणून तीन लाख रु. जमा करावे लागणार आहेत.