कर्नाटकचे नवे मुख्‍यमंत्री कोण? पक्षाध्‍यक्ष खर्गे म्‍हणाले,”पक्ष निरीक्षक आज…”

मल्लिकार्जुन खर्गे ( संग्रहित छायाचित्र )
मल्लिकार्जुन खर्गे ( संग्रहित छायाचित्र )
Published on: 
Updated on: 

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : काँग्रेस पक्षाचे निरीक्षक बंगळूरला गेले आहेत. येथे आज (दि.१४) सायंकाळी काँग्रेस विधिमंडळ पक्षाची ( सीएलपी ) बैठक होईल. या बैठकीनंतर पक्ष निरीक्षक पक्ष श्रेष्‍ठींना या बैठकीत मांडली गेलेली मते सांगतील. त्‍यानंतर पक्षश्रेष्‍ठी (हायकमांड) कर्नाटकचे मुख्‍यमंत्री कोण होणार याबाबत निर्णय देतील, अशी माहिती काँग्रेसचे अध्‍यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी आज ( दि. १४ ) माध्‍यमांशी बोलताना दिली. ( Karnataka Election Results 2023 )

कर्नाटक विधानसभा निवडणुकीमध्‍ये काँग्रेसने पूर्ण बहुमत मिळवले आहे. यानंतर कोणताही धोका नको यासाठी सर्व आमदारांना बंगळूर येथे हलविण्‍यात आले आहे. याबाबत माहिती देताना पक्षाध्‍यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्‍हणाले की, "आज सायंकाळी काँग्रेस विधिमंडळ पक्षाची (सीएलपी) बंगळूर येथे बैठक होणार आहे. या बैठकीनंतर पक्ष निरीक्षक पक्ष श्रेष्‍ठींना या बैठकीत मांडली गेलेली मते सांगतील. त्‍यानंतर पक्षश्रेष्‍ठी (हायकमांड) कर्नाटकचे मुख्‍यमंत्री कोण होणार याबाबत निर्णय देतील." ( Karnataka Election Results 2023 )

सिद्धरामय्या की, डी. के. शिवकुमार ? मुख्यमंत्रिपदासाठी दोन नेत्यांमध्ये स्पर्धा

कर्नाटक मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार कोण असेल? कोणाची दावेदारी सर्वाधिक प्रबळ आहे, याबद्दल निकालानंतरच चर्चा सुरू झाली आहे. सध्या या स्पर्धेत सिद्धरामय्या आणि डी. के. शिवकुमार हे दोन दिग्गज आहेत.. सिद्धरामय्या यांनी स्वतःच काँग्रेसने अद्याप मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर केलेला नसला तरी शिवकुमार हे या पदाच्या शर्यतीत एक स्पर्धक निश्चितच आहेत, असे स्पष्ट केलेले आहे. कर्नाटकमध्ये निकालापूर्वी काँग्रेस पक्षाने याआधीही मुख्यमंत्र्यांचा चेहरा पडद्याआडच ठेवलेला आहे. निवडून आलेल्या आमदारांच्या मतांनंतरच हायकमांड कोण मुख्यमंत्री त्याबद्दल निर्णय घेतील, असेच यावेळीही ठरलेले आहे. सिद्धरामय्या हे अनुभवी आहेत आणि सरकार चालवण्याचा त्यांना अनुभव आहे. दुसरीकडे, डी. के शिवकुमार यांचेही पक्षासाठीचे योगदान मोठे आहे.

Karnataka Election Results 2023 : सिद्धरामय्या प्रबळ दावेदारांपैकी एक

सिद्धरामय्या हे २०१३ ते २०१८ दरम्यान कर्नाटकचे मुख्यमंत्री होते. मुख्यमंत्रिपदाच्या काळात त्यांनी गरिबांसाठी अनेक योजना सुरू केल्या. त्यांच्या अन्न भाग्य योजनेत सात किलो तांदूळ सर्व शालेय विद्यार्थ्यांना १५० ग्रॅम दूध देणे, इंदिरा कॅन्टिनमुळे राज्यातील गरिबांना मोठा दिलासा मिळाला होता. सिद्धरामय्या यांच्या जमेच्या बाजू जशा आहेत. तशा काही वजा बाजूरी आहेत. पीएफआय' आणि एसटीपीआय' कार्यकत्यांना तुरुंगातून मुक्त करण्याच्या निर्णयाने एका वर्गाचा रोष त्यांनी ओढवून घेतला होता.

Karnataka Election Results 2023 : डी. के. शिवकुमार यांचाही दावा

शिवकुमार यांनी १२ मे रोजी एका टिच्या माध्यमातून मुख्यमंत्रिपदासाठीची दावेदारी बोलून दाखविलेली आहे. निकालाच्या एक दिवसआधीच शिवकुमार यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणून ३ वर्षे राज्यात घेतलेल्या परिश्रमाचा व्हिडीओही शेअर करून विजयातील आपला शेअर मोठा असल्याचे जाहीर केलेले आहे. ते कनकापुरा मतदारसंघातून सलग ८ वेळा आमदार आहेत. २०१८ च्या निवडणुकीतही त्यांची मुख्यमंत्रिपदाची संधी हुकली होती. कॉग्रेसचे संकटमोचक अशी त्यांची ओळख आहे.२०१८ च्या निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत नव्हते. भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आलेला असला, तरी बहुमतासाठी मोजके आमदारही भाजपला उपलब्ध होऊ शकले नव्हते. शिवकुमार यांनाच त्याचे श्रेय जाते.

गुजरातमध्ये राज्यसभेच्या निवडणुकीत अहमद पटेल कॉग्रेसचे उमेदवार असताना शिवकुमार यांनी गुजरात कॉंग्रेसच्या सर्व ४४ आमदारांना बंगळूर येथील त्यांच्या रिसॉर्टमध्ये ठेवले होते, शिवकुमार हे देशातील सर्वात श्रीमंत राजकारण्यापैकी एक आहेत. १,४१३.७८ कोटी रुपयांची संपत्ती त्यांनी जाहीर केली आहे. जमेच्या या बाजूसह भ्रष्टाचारप्रकरणी झालेली अटक ही त्यांची वजा बाजू आहे. मनी लाँडरिंग आणि करचुकवेगिरीचे गुन्हेही त्यांच्याविरोधात दाखल झालेले आहेत.

Karnataka Election Results 2023 : … तर मल्लिकार्जुन खर्गे हा पर्याय

सिद्धरामय्या व शिवकुमार यांच्यातील स्पर्धेमुळे पक्षाला नुकसान नको म्हणून तिसरा मार्ग काँग्रेस पक्ष चोखाळेल, अशीही चर्चा सुरू झाली आहे. यातून काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची मुख्यमंत्रिपदी वर्णी शक्य आहे. 'एक व्यक्ती एक पद या काँग्रेसच्या धोरणांतर्गत खर्गे यांना मग राष्ट्रीय अध्यक्षपद सोडावे लागेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news