सेमीकंडक्टर लॅबच्या स्थापनेसाठी केंद्र सरकार करणार दोन अब्ज डाॅलर्सची गुंतवणूक | पुढारी

सेमीकंडक्टर लॅबच्या स्थापनेसाठी केंद्र सरकार करणार दोन अब्ज डाॅलर्सची गुंतवणूक

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : मोहाली येथे स्थापन केल्या जाणाऱ्या सेमी कंडक्टर लॅबसाठी केंद्र सरकार दोन अब्ज डाॅलर्सची गुंतवणूक करणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी आज (दि.१२) आयआयटी दिल्लीमध्ये एका कार्यक्रमात बोलताना दिली. सेमीकंडक्टर संशोधन तसेच प्रोटोटाईपसाठी हा प्रकल्प उभारला जात आहे.

या प्रकल्पात याआधी 1.3 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याची योजना होती, मात्र आता दोन अब्ज डाॅलर्स गुंतविले जाणार असल्याचे चंद्रशेखर यांनी नमूद केले. सेमीकंडक्टर उद्योगाला चालना देण्यासाठी इंडियन सेमीकंडक्टर रिसर्च इनि्स्टट्यूट स्थापना देखील केली जाणार आहे. आयआयटी दिल्ली, आयआयटी चेन्नई तसेच इतर तंत्रशिक्षण संस्थांचे सहकार्य इनि्स्टट्यूटसाठी घेतले जाईल. आयआयटीमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी सेमीकंडक्टर, क्वांटम टेक्नॉलॉजी, आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये संशोधन करावे, असे आवाहनही चंद्रशेखर यांनी केले.

उच्च शिक्षण क्षेत्राच्या अभ्यासक्रमात सेमीकंडक्टर विषयाचा समावेश केला जाणार असल्याचे सांगत चंद्रशेखर पुढे म्हणाले की, अलिकडील काळात सेमीकंडक्टर क्षेत्रात 27 नवीन स्टार्टअप्स सुरु झालेले आहेत. ही संख्या शंभर पर्यंत नेण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. सेमीकंडक्टर डिझाईन स्टार्टअप्सना प्रोत्साहन देण्यासाठी 1100 ते 1200 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. शिवाय सेमीकंडक्टर उद्योगाच्या पीएलआय योजनेसाठी 76 हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.

             हेही वाचा 

 

 

Back to top button