कर्नाटक विधानसभा निवडणूक : डबल इंजिन - ट्रबल इंजिन ते जय बजरंगबली ! | पुढारी

कर्नाटक विधानसभा निवडणूक : डबल इंजिन - ट्रबल इंजिन ते जय बजरंगबली !

बंगळूर; पुढारी वृत्तसेवा : विधानसभा निवडणूक जाहीर प्रचाराची सोमवारी सायंकाळी सांगता झाली. प्रचार काळात ‘पे सीएम, से पीएम’, डबल इंजिन-ट्रबल इंजिन, बजरंगबली असे मुद्दे गाजले. बुधवारी (10 मे) मतदान असून शनिवारी 13 मे रोजी मतमोजणी होईल.

भाजप सरकारकडून विकासकामांत 40 टक्के कमिशन घेतले जात असल्याचा आरोप काँग्रेसकडून सुरुवातीपासून झाला. कमिशन आणि बिल न मिळाल्याने बेळगावातील कंत्राटदाराने आत्महत्या केली. याची चर्चा राष्ट्रीय पातळीवर झाली होती. त्यानंतर काँग्रेसने भाजपच्या भ—ष्टाचाराविरुद्ध पे सीएम (मुख्य मंत्र्याला लाच द्या) आंदोलन केले. पोस्टरवर मुख्यमंत्री बोम्मई यांचा फोटो लावून त्या खाली कोड दिला. सरकारकडे कोणतेही काम असेल तर त्यासाठी आधी कमिशन जमा करा, असे आवाहन काँग्रेसने केले. हा मुद्दा निवडणुकीतही लावून धरण्यात आला.

कर्नाटकात भ—ष्टाचार होत आहे. याची सर्व कल्पना पंतप्रधान मोदींना आहे. तरीही त्यावर एक शब्दही ते उच्चारत नाहीत. आतापर्यंत अनेक घोटाळे काँग्रेसने समोर आणले. आता पंतप्रधानांनी स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी करून से पीएम ही घोषणाबाजीही काँग्रेसकडून केली. केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारच्या डबल इंजिन सरकारमुळे वेगाने विकास साधला जात असल्याचा दावा करत भाजप नेत्यांनी मतांची मागणी केली. पण भ—ष्टाचार, विकासकामांचा सुमार दर्जा, अधिकार्‍यांची मनमानी अशा अनेक कारणांमुळे हे डबल इंजिन म्हणजे ट्रबल इंजिन असल्याची विडंबना काँग्रेसने केली. डबल इंजिन सरकारमध्ये विकासकामांवर कमी आणि अंतर्गत राजकारणावर चर्चा होते, अशी टीकाही झाली.

कॉँग्रेसने भाजप सत्ताकाळात मंत्री पदापासून बदल्यांना किती कोटी घेतले जातात, ही यादीच सादर केली. त्यावर आक्षेप घेत भाजपने काँग्रेसविरुद्ध तक्रार नोंदवली आहे. तर निवडणूक आयोगाने काँग्रेसला नोटिस बजावली आहे.

बजरंगबली की जय!

काँग्रेसच्या जाहीरनाम्यात अनेक आश्वासने देण्यात आली. मोफत वीज, कुटुंबप्रमुख महिलेला मासिक दोन हजार रुपये, बेरोजगारांना भत्ता तसेच बजरंग दलावर बंदी हे त्यातील प्रमुख मुद्दे होते. हिंदुत्ववादी संघटना असणार्‍या बजरंग दलावर बंदीचे आश्वासन दिल्याने भाजपने तीव— टीका केली. बजरंग दल ही दहशतवादी संघटना नाही. हिंदुत्ववादी संघटना आहे. याविरोधात ‘बजरंगबली की जय’च्या घोषणा देण्यात आल्या. गल्लोगल्ली हनुमान चालिसा पठण करण्यात आले.

Back to top button