सोनिया गांधींविरोधात गुन्हा दाखल करा; भाजपची केंद्रीय निवडणूक आयोगात तक्रार | पुढारी

सोनिया गांधींविरोधात गुन्हा दाखल करा; भाजपची केंद्रीय निवडणूक आयोगात तक्रार

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : कॉंग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी हुबळीमधील एक भाषणादरम्यान ‘सार्वभौमत्व’ शब्दाचा वापर केल्यानंतर भाजप आक्रमक झाली आहे. यासंदर्भात केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव, भाजप माध्यम प्रमुख अनिल बलूनी तसेच भाजप नेते तरुण चुग यांच्या शिष्टमंडळाने आज (दि. ८) केंद्रीय निवडणूक आयोगात तक्रार केली.

शुक्रवारी कॉंग्रेसने एक ट्विट करीत सोनिया यांच्या भाषणाचा एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओमधील सोनिया यांच्या भाषणावर भाजपने आक्षेप घेतला आहे. सोनिया यांनी मुद्दाम सार्वभौमत्व शब्दाचा वापर केल्याचे केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव म्हणाले. कॉंग्रेसचे घोषणापत्र म्हणजे तुकडे-तुकडे गॅंगचा अजेंडा असल्यामुळेच त्या अशा शब्दांचा वापर करीत आहे. आयोगाकडून अशाप्रकारच्या राष्ट्रविरोधी कृत्याविरोधात कारवाई केली जाईल, असा विश्वास यावेळी यादव यांनी व्यक्त केला.

हुबळीत दिलेल्या भाषणात सोनिया यांनी सार्वभौमत्व शब्दाचा वापर केला होता. हा शब्द केवळ देशासाठी वापरला जातो, असे स्पष्ट करीत केंद्रीय मंत्री,भाजप खासदार शोभा करंदलाजे यांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करीत कारवाई मागणी केली. सोनिया तुकडे-तुकडे टोळीच्या प्रमुख आहेत,अशी टीका देखील त्यांनी केली. ६ मे रोजी सोनिया गांधी यांनी हुबळीतील सभेला संबोधित करीत ‘कॉंग्रेस कर्नाटकची प्रतिष्ठा, सार्वभौमत्व तसेच अखंडतेसाठी धोका निर्माण करणाऱ्यांना परवानगी देणार नाही’ असे वक्तव्य त्यांनी  केले होते.
हेही वाचा 

Back to top button