शिरोळ दत्त साखर कारखाना देणार एकरकमी २९२० रुपये एफआरपी | पुढारी

शिरोळ दत्त साखर कारखाना देणार एकरकमी २९२० रुपये एफआरपी

शिरोळ : पुढारी वृत्तसेवा

चालू हंगामात गाळपास येणाऱ्या ऊस उत्पादकांच्या उसाला एकरकमी 2 हजार 920 रुपये एफआरपी देणार अशी घोषणा शिरोळ दत्त साखर कारखाना चे अध्यक्ष गणपतराव पाटील यांनी केली. कारखान्याच्या बॉयलर अग्नी प्रदीपन कार्यक्रमाचे औचित्य साधून पाटील यांनी शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी बरोबर कामगारांना 21 टक्के एकरकमी बोनस देणार असल्याचे सांगितले.

शुक्रवारी अध्यक्ष गणपतराव पाटील यांच्या हस्ते बॉयलर अग्नि प्रदीपन समारंभ पार पडला यावेळी पाटील बोलत होते. महापुरामुळे शेतकऱ्यांच्या उसाचे अतोनात नुकसान झाले आहे. काही प्रमाणात ऊस कुजून जात आहे. त्यामुळे उसाची तोड लवकर करण्याकरिता महापुरात बुडीत झालेल्या उसाला प्रथम प्राधान्याने तोडी देऊन ऊस गाळपास आणावा अशा सूचना शेती विभागाला देण्यात आल्या आहेत. याशिवाय चालू गळीत हंगामात उसाबरोबर बीटाचेही गाळप करण्यात येणार आहे, असे पाटील यांनी नमूद केले.

संचालक इंद्रजीत पाटील, राजश्री पाटील यांच्या हस्ते विधीवत पुजन करण्यात आले. यावेळी अनिलराव यादव उपाध्यक्ष श्रेणिक पाटील सर्व संचालक मंडळ, कारखान्याचे कार्यकारी संचालक एम.व्ही.पाटील, सचिव अशोक शिंदे, सर्व विभागाचे खातेप्रमुख, पदाधिकारी, मान्यवर व शेतकरी उपस्थित होते.

बीटा पासून इथेनॉल निर्मितीचा प्रयत्न ( शिरोळ दत्त साखर कारखाना )

कारखान्याने प्रायोगिक तत्त्वावर पन्नास एकर क्षेत्रामध्ये बीटाचे उत्पादन घेतले आहे. याचे चालू गळीत हंगामात गाळप होणार आहे. याखेरीज बीटा पासून इथेनॉल निर्मिती करता येईल का ? यासाठी प्रयत्न सुरू केले असून हा प्रयोग यशस्वी झाल्यास बारा महिने बीट गाळप करणे शक्य होणार आहे. याचा शेतकरी सभासद तसेच कारखान्याला फायदा होणार आहे. असे गणपतराव पाटील यांनी सांगितले.

एकरकमी एफआरपी देणारा दत्त जिल्ह्यातील दुसरा कारखाना 

कागल, छत्रपती शाहू नंतर कोल्हापूर जिल्ह्यात एकरकमी ऊस दराची कोंडी फोडणारा शिरोळ दत्त साखर कारखाना हा दुसरा तर, शिरोळ तालुक्यातील पहिला साखर कारखाना ठरला आहे. दत्त साखर कारखान्याने एकरकमी एफआरपीची घोषणा केल्यामुळे शिरोळ व हातकणंगले तालुक्यातील इतर साखर कारखान्यांना एकरकमी एफआरपीचे आव्हान पेलावे लागणार आहे. शिवाय ज्या विविध शेतकरी संघटनांनीनी ऊस परिषद, आंदोलनाची घोषणा केली आहे. त्यांचीही गोची झाली आहे.

राजकारण कारखान्याच्या बाहेर 

शिरोळ दत्त साखर कारखान्याने एकरकमी एफआरपीची घोषणा केल्यानंतर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना, अध्यक्ष गणपतराव पाटील म्हणाले, कारखान्यात राजकारण नाही. येथे शेतकरी सभासद, कामगार, योजना व हित एवढेच. जिल्हा बँक निवडणूक, राजकारण कारखान्याच्या बाहेर.

Back to top button