देशातील आंबा उत्पादन यंदा ५० लाख टनांनी कमी होणार | पुढारी

देशातील आंबा उत्पादन यंदा ५० लाख टनांनी कमी होणार

नवी दिल्ली; वृत्तसंस्था :  अवकाळी पावसासह वादळी वारे आणि गारपिटीमुळे आंबा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. उत्तर प्रदेश आणि आंध्र प्रदेशमध्ये आंब्यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. या दोन्ही राज्यांतून निसर्ग आंब्यावर रूसल्याने ५० टक्क्यांपर्यंत कमी होईल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

आंध्र प्रदेशच्या आंब्यांची बाजारातील आवक दरवर्षाच्या तुलनेत सध्याही कमीच आहे. आंध्र प्रदेशातील आंबे मेअखेरीस मोठ्या प्रमाणावर बाजारात येतात. दोन्ही राज्यांतील आंबा उत्पादक आणि वितरक यंदा फारसे उत्साहात नाहीत. जेथे आंब्याचा लाग झडला आहे, तेथे काही प्रमाणात भरपाई होण्याची शक्यता आहे. आंब्यांचा आकार या ठिकाणी ५० टक्क्यांपर्यंत वाढू शकतो, असे भारतीय कृषी संशोधन परिषदेचे म्हणणे आहे. याउपर सरासरी २० टक्क्यांहून कमी आंबा हाती येईल, असा परिषदेचा अंदाज आहे.

दुसरीकडे, अनेक ठिकाणी आंब्याच्या झाडावरील संपूर्ण घड गळून गेले आहेत. फुलेही उरलेली नाहीत. अशा स्थितीत उत्पादन वाढण्याची शक्यता नाही, असे वितरकांचे म्हणणे आहे. देशातील आंब्यांच्या एकूण उत्पादनापैकी २३% उत्पादन उत्तर प्रदेशात होते.
यंदा ५० लाख मेट्रिक टन उत्पादनाचा अंदाज होता. आता तो २५ लाख मेट्रिक टनांवर आला आहे. बिहारमध्ये आंब्याचे उत्पादन १७ लाख टनांवर जाऊ शकते, असा अंदाज आहे. अवकाळी पावसाचा फटका यंदा आंबा पिकाला बसला आहे.

Back to top button