

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : सार्वजनिक ठिकाणांचे सौंदर्य वाढविण्याच्या उद्देशाने केंद्रीय गृहनिर्माण व नागरी व्यवहार मंत्रालयाने सुंदर शहर स्पर्धा जाहीर केली आहे. सार्वजनिक ठिकाणे सुंदर, कल्पक आणि सर्वसमावेशक बनविणाऱ्या सर्वोत्कृष्ट शहरांना या स्पर्धेत बक्षिसे दिली जाणार आहेत.
या स्पर्धेअंतर्गत शहरांमधील वॉर्ड आणि सार्वजनिक ठिकाणांचे परीक्षण केले जाणार आहे. यात सहज प्रवेश सुविधा, उपक्रम, निसर्गसौंदर्य आणि रचना या बाबींची पाहणी केली जाईल. १५ जुलै २०२३ पर्यंत शहरे या स्पर्धेत भाग घेऊ शकतील. या स्पर्धेद्वारे आपली सुंदर सार्वजनिक ठिकाणे जगापुढे आणण्याची संधी शहरांना मिळणार आहे. याद्वारे शहरांची परंपरा आणि निसर्ग संवर्धनही देशापुढे मांडता येणार आहे. विविध राज्ये आणि शहरांमध्ये ज्या पद्धतीने सार्वजनिक ठिकाणे विकसित करण्यात आली आहेत, त्यांचे अनुकरण इतरांना करता येईल.
निवडक वॉर्डांना शहर आणि राज्य पातळीवर गौरविले जाणार आहे. सर्वांत सुंदर सार्वजनिक ठिकाणांना राज्य पातळीवर चार गटांत पुरस्कार दिले जातील. जलाशय, हिरवळयुक्त ठिकाणे, पर्यटन / ऐतिहासिक स्थळे आणि बाजारपेठ / व्यावसायिक ठिकाणे हे ते चार गट असतील