शरद पवार-गौतम अदानी भेटीवरून आसामच्या मुख्यमंत्र्यांचे राहुल गांधींना आव्हान | पुढारी

शरद पवार-गौतम अदानी भेटीवरून आसामच्या मुख्यमंत्र्यांचे राहुल गांधींना आव्हान

पुढारी ऑनलाईन डेस्क : आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात ट्विट करण्याचे आव्हान दिले आहे. अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी आणि शरद पवार यांच्या नुकत्याच झालेल्या भेटीचा संदर्भ देताना मुख्यमंत्री सरमा यांनी  बुधवारी (दि.२६) एका कार्यक्रमात हे आव्हान दिले.

सध्या देशात अदानी यांचे नाव चर्चेत आहे. या प्रकरणावरून विरोधक भाजपवर हल्लाबोल करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधत आहेत. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा बुधवारी अदानी आणि पवार भेटीचा संदर्भ देत म्हणाले की, राहुल गांधींनी ट्विट करत आम्ही अदानींचे मित्र आहोत. मी त्यांना ओळखतही नाही. ईशान्येतील लोकांना अदानी, अंबानी आणि टाटा यांच्यापर्यंत पोहोचायला थोडा वेळ लागेल. पण आम्ही तिथे पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत. राहुल गांधींना मी आव्हान देतो की, त्यांनी शरद पवारांविरोधात ट्विट करावे? पवार यांचे अदानीशी संबंध काय, हे ते विचारू शकतील का? हे लोक सोयीचे राजकारण करतात. शरद पवार अदानी यांना भेटल्याने आम्हाला कोणतीही अडचण नाही. पण राहुल भाजप आणि अदानींवर ट्विट करतात, पण अदानी जेव्हा पवारांच्या घरी जातात. तिथे दोन- तीन तास थांबतात, यावर ते ट्विट का करत नाहीत? असा सवाल सरमा यांनी केला आहे.

राहुल गांधी ट्विट स्वतः करतात की नाही याबद्दल मला शंका आहे. आसाममधील एका वरिष्ठ काँग्रेस नेत्याने मला सांगितले की, राहुल गांधी यांनी काय ट्विट केले आहे, हे त्यांनाच माहीत नसतं. कोणीतरी त्यांना हे ट्विट करायला सांगत असते, अशी टीका सरमा यांनी केली आहे.

विशेष म्हणजे, काही दिवसांपुर्वी राहुल गांधींनी त्यांच्या एका ट्विटमध्ये हिमंता बिस्वा सरमा, गुलाम नबी आझाद यांसारख्या काही माजी काँग्रेस नेत्यांची नावे अदानीशी जोडली होती. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले होते की, हे नेते सत्य लपवत असून लोकांची दिशाभूल करत आहेत. या ट्विटबाबत सरमा यांनी राहुल यांच्यावर मानहानीचा खटला दाखल करण्याचा इशारा दिला होता.

हेही वाचा : 

Back to top button