ब्रेकिंग! छत्तीसगडच्या दंतेवाडामध्ये नक्षलींकडून आयईडी स्फोट; 10 जवान शहीद | पुढारी

ब्रेकिंग! छत्तीसगडच्या दंतेवाडामध्ये नक्षलींकडून आयईडी स्फोट; 10 जवान शहीद

रायपूर, पुढारी ऑनलाईन : छत्तीसगडमधील दंतेवाडा येथे नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलांवर मोठा हल्ला केला आहे. नक्षलवाद्यांनी पेरलेल्या आयईडी स्फोटात 10 जवान शहीद झाले असून एका चालकाचाही मृत्यू झाला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने याबाबत ट्विट करून माहिती दिली आहे.

अरणपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत नक्षलवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. त्यामुळे पुढील कारवाईसाठी दंतेवाडा येथून नक्षलविरोधी कारवाईसाठी डीआरजी फोर्स पाठवण्यात आले. मोहिमेनंतर परतत असताना नक्षलवाद्यांनी अरणपूर रोडवर आयईडीचा स्फोट घडवून आणला. या हल्ल्यात 10 डीआरजी जवान आणि ऑपरेशनमध्ये सहभागी असलेला एक चालक शहीद झाला.

या घटनेला दुजोरा देत मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी शोक व्यक्त केला आहे. हा लढा अंतिम टप्प्यात असून नक्षलवाद्यांना कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे. नियोजनबद्ध पद्धतीने नक्षलवादाचा नायनाट केला जाईल, असेही त्यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्री बघेल यांनी ट्विट करून म्हटलंय की, नक्षलवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाल्यानंतर डीआरजीचे जवान मोहिमेवर निघाले होते. अरणपूर जवळ नक्षलवाद्यांनी IED स्फोट घडवून आणला. यात 10 जवानांसह गाडीचा चालक शहीद झाले. दंतेवाडामधील ही घटना अत्यंत वेदनादायी आहे. आहे. सर्व शहीदांच्या कुटुंबीयांच्या दु:खात आम्ही सर्व सहभागी आहोत. नक्षलींना या हल्ल्याची किंमत मोजावी लागणार, असा सज्जड इशारा त्यांनी दिला.

Back to top button