जैश-ए-मोहम्मद च्या टॉप कमांडरचा खात्मा, जवान आणि पोलिसांकडून संयुक्त कारवाई | पुढारी

जैश-ए-मोहम्मद च्या टॉप कमांडरचा खात्मा, जवान आणि पोलिसांकडून संयुक्त कारवाई

जम्मू ; अनिल साक्षी : सुरक्षा दलाने दहशतवाद्यांविरोधात आघाडी उघडली असून, त्रालमध्ये उडालेल्या चकमकीत जैश-ए-मोहम्मद च्या टॉप कमांडरला यमसदनी धाडण्यात आले. शमीम ऊर्फ शाम सोफी असे त्याचे नाव आहे.

त्रालच्या तिलवानी मोहल्ल्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांदरम्यान ही चकमक झाली. गेल्या 36 तासांत 9 दहशतवाद्यांना ठार करण्यात आले आहे. दरम्यान, राजौरी आणि पूँछमध्ये लष्कराचे जवान आणि पोलिसांनी तिसर्‍या दिवशीही संयुक्‍त शोधमोहीम सुरूच ठेवली आहे.

काश्मीरचे पोलिस महानिरीक्षक विजय कुमार यांनी कारवाईची माहिती दिली. चकमकीच्या आधी परिसरातील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. जैश-ए-मोहम्मद चा दहशतवादी लपलेल्या ठिकाणी सुरक्षा दलांनी वेढा दिला आणि सोफीला यमसदनी धाडण्यात आले.

सध्या येथील नैसर्गिक आणि भौगोलिक परिस्थिती कमालीची आव्हानात्मक बनली आहे. तथापि, ठोस कारवाई करण्याच्या द‍ृष्टीने रणनीती आखली असून, त्याला यश येत असल्याचे विजयकुमार यांनी सांगितले.

Back to top button