जर्मन मासिकात भारताच्‍या लोकसंख्‍या वाढीवर आपेक्षार्ह व्‍यंगचित्र, मंत्री चंद्रशेखर म्‍हणाले… | पुढारी

जर्मन मासिकात भारताच्‍या लोकसंख्‍या वाढीवर आपेक्षार्ह व्‍यंगचित्र, मंत्री चंद्रशेखर म्‍हणाले...

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : भारत नुकताच जगातील सर्वाधिक लोकसंख्‍या असणारा देश झाला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या आकडेवारीनुसार भारताची लोकसंख्या १४२.८६ कोटी चीनची लोकसंख्या १४२.५७ कोटी आहे. यावरुन जर्मनीतील डेर स्‍पीगल मासिकाने भारताची खिल्‍ली उडवणारे एक आपेक्षार्ह व्‍यंगचित्र प्रकाशित केले आहे. याला माहिती व तंत्रज्ञान मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी उत्तर दिले आहे.

भारत-चीनची तुलना करत उडवली खिल्‍ली

जर्मनीमधील मासिकात प्रकाशित झालेल्‍या व्‍यंगचित्रात भारत आणि चीनची लोकसंख्‍येवरुन तुलना करणार्‍या दोन रेल्‍वे गाड्या दाखवण्‍यात आल्‍यात आहे. एका बाजूला तुडूंब गर्दीने खचाखच भरलेली भारतातील जुनी ट्रेन दाखवली आहे. त्‍यावर भारतातील लोक तिरंगा घेऊन बसलेले आहेत. तर त्‍याच्‍याच बाजूला चीनची बुलेट ट्रेन एका वेगळ्या ट्रॅकवर दिसत आहे. यामध्‍ये बुलेट ट्रेनमध्‍ये दोन चालक बसल्‍याचे दिसत आहेत. या व्‍यंगचित्रातून भारत आणि चीनची तुलना केली आहेच त्‍याचबरोबर चीनने तंत्रज्ञानात केलेली प्रगती दाखवली आहे. यावर माहिती व तंत्रज्ञान मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी जर्मनीला उत्तर देत आपला संताप व्‍यक्‍त केला आहे.

येत्‍या काही वर्षात भारताची अर्थव्‍यवस्‍था जर्मनीपेक्षा मोठी असेल

राजीव चंद्रशेखर यांनी ट्विट केले आहे की, येत्या काही वर्षांत भारताची अर्थव्यवस्था जर्मनीपेक्षा खूप मोठी असेल. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भारताविरुद्ध तुम्‍ही चुकीचा प्रचार करत आहात. काही वर्षांत भारताची अर्थव्यवस्था जर्मनीपेक्षा मोठी होईल. दरम्‍यान, काही भारतीयांनी हे व्‍यंगचित्र योग्‍य असल्‍याचे म्‍हटले आहे. भारतीय सणांच्या वेळी लाखो स्‍थलांतरीत लोक आपल्‍या घरी जातात असतात. त्यामुळे काही रेल्‍वे गाड्या या कार्टूनसारख्याच दिसतात, असे काहीचे म्‍हणणे आहे.

…हे तर अत्‍यंत जातीयवादी

व्‍यंगचित्रात भारताचे केलेले हे चित्रण वास्तवाशी साधर्म्य दाखवत नाही. भारताला अपमानित करून चीनपुढे नमते घेणे हा त्याचा उद्देश आहे. न्यूयॉर्क टाइम्समध्ये भारताच्या यशस्वी मंगळ मोहिमेची खिल्ली उडवणाऱ्या वर्णद्वेषी व्यंगचित्रापेक्षा हे वाईट आहे, असे मत माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या वरिष्ठ सल्लागार कांचन गुप्ता यांनी व्‍यक्‍त केले आहे.

Back to top button