Parkash Singh Badal : पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल यांचे निधन

Parkash Singh Badal : पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल यांचे निधन

पुढारी ऑनलाईन डेस्क : पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दलाचे (एसएडी) नेते प्रकाश सिंग बादल यांचे मंगळवारी वयाच्या ९५ व्या वर्षी निधन झाले. मोहाली येथील खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रकाशसिंग बादल हे गेल्या अनेक दिवसांपासून रुग्णालयात दाखल होते.

बादल यांना आठवडाभरापूर्वी श्वास घेण्यास त्रास होत असल्याने मोहालीतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून ते आयसीयूमध्ये होते. सोमवारी हॉस्पिटलने त्यांच्या प्रकृतीबाबत जारी केलेल्या हेल्थ बुलेटिनमध्ये बादल हे आयसीयूमध्ये डॉक्टरांच्या देखरेखीखाली राहतील, असे म्हटले होते.

पंजाबमध्ये 5 वेळा मुख्यमंत्री

पंजाबचे पाच वेळा मुख्यमंत्री राहिलेले प्रकाश सिंग बादल यांचा जन्म 8 डिसेंबर 1927 रोजी अबुल खुराना गावात झाला होता. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. प्रकाशसिंग बादल यांचा मुलगा सुखबीर सिंग बादल हे पंजाबच्या जलालाबाद मतदारसंघातून आमदार आहेत आणि पंजाबचे उपमुख्यमंत्री राहिले आहेत. प्रकाश सिंग बादल हे गेल्या अनेक दशकांपासून राजकारणाचा महत्त्वाचा भाग राहिले.

बादल यांचा राजकीय प्रवास

शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख प्रकाश सिंह बादल यांनी 1947 मध्ये राजकारणात प्रवेश केला. त्यांनी 1957 मध्ये पहिली विधानसभा निवडणूक जिंकली. 1969 मध्ये त्यांनी पुन्हा विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला. 1969-1970 पर्यंत त्यांनी सामुदायिक विकास, पंचायती राज, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय इत्यादी मंत्रालयांमध्ये कार्यकारी मंत्री म्हणून काम केले. प्रकाश सिंग बादल हे 1970-71, 1977-80, 1997-2002 मध्ये पंजाबचे मुख्यमंत्री आणि 1972, 1980 आणि 2002 मध्ये विरोधी पक्षनेते राहिले आहेत. बादल मोरारजी देसाई यांच्या सरकारमध्ये ते खासदारही झाले. केंद्रीय मंत्री म्हणून त्यांच्याकडे कृषी आणि पाटबंधारे मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.

logo
Pudhari News
pudhari.news