…म्हणून पोलिसांनी जोखीम पत्करून अमृतपाल सिंगच्या मुसक्या आवळल्या | पुढारी

...म्हणून पोलिसांनी जोखीम पत्करून अमृतपाल सिंगच्या मुसक्या आवळल्या

चंदीगड; वृत्तसंस्था :  ‘वारिस पंजाब दे’ संघटनेचा प्रमुख तसेच खलिस्तानवादी अमृतपाल सिंग याची आधीपासूनच थाटात शरणागती पत्करण्याची इच्छा होती. फरार झाल्यानंतर 36 दिवसांनी पुन्हा त्याची ही इच्छा जागृत झाली. त्याला समर्थकांसमोर पोलिसांकडे शरणागती पत्करायची होती, पण अमृतपालने तसे केल्यास शरणागतीला वेगळे वळण मिळू शकते, अशी गुप्तवार्ता पोलिसांना मिळाल्याने जोखीम पत्करून रविवारी पहाटे अमृतपालच्या मुसक्या आवळण्यात आल्या.

अमृतपाल याने शरणागतीसाठी अकाल तख्तचे माजी जत्थेदार जसबीर सिंग रोडे यांच्याशी संपर्क साधला. जसबीर रोडे मोगा जिल्ह्यातील रोडे गावचे आहेत. रोडे हे खलिस्तानवादी जरनैल सिंग भिंद्रनवाले (इंदिरा गांधी पंतप्रधान असताना अमृतसरमधील सुवर्ण मंदिरात ऑपरेशन ब्लू स्टार ही लष्करी मोहीम राबवून याचा खात्मा करण्यात आला होता.) याचे भाचे आहेत. भिंद्रनवाले हाही रोडे गावचाच होता. अमृतपालने जसबीर सिंग रोडेच्या उपस्थितीत शरणागती पत्करण्याची इच्छा व्यक्त केली होती.

रोडे याने सर्वप्रथम केंद्रीय यंत्रणांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. प्रतिसाद न मिळाल्याने त्याने पंजाब पोलिसांशी संपर्क केला. अमृतपाल रविवारी रोडे गावात शरणागती पत्करेल, असे ठरले. समर्थकांच्या गर्दीसमोर रविवारी दुपारी शरणागतीची अमृतपालची योजना होती. त्याला गर्दीत शरणागती पत्करण्याची संधी दिली तर वातावरण बिघडू शकते, अशी गुप्तवार्ता मिळताच पंजाब पोलिसांनी रविवारी भल्या पहाटेच रोडे गावालगत मोठा फौजफाटा उभा केला.

अमृतपाल गावात असल्याची खात्री पटताच गावाला वेढा घातला. नंतर अमृतपालच्या अटकेसाठी काही पोलिस अधिकारी साध्या वेशात गावात दाखल झाले. गावातील गुरुद्वारा संत खालसा येथून त्याला अटक करण्यात आली.

काय केले होते अमृतपालने

  • अमृतपाल सिंगने भारताच्या विभाजनाची योजना आखलेली असून, त्याला शिखांसाठी खलिस्तान हा स्वतंत्र देश हवा आहे. तो वारंवार तसे सार्वजनिकरित्या बोलून दाखवत असे.
  •  23 फेब्रुवारी रोजी अजनाला पोलिस ठाण्यावर तलवारी, बंदुकांसह अमृतपाल सिंगच्या ‘वारिस पंजाब दे’ या संघटनेशी संबंधित प्रचंड जमावाने हल्ला केला होता. ठाण्यात बंद असलेल्या अमृतपाल सिंग समर्थकाला सोडवून नेले होते.
  •  इंदिरा गांधींबाबत जे काही घडले (हत्या), तेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासंदर्भातही घडू शकते, अशी अप्रत्यक्ष धमकीही अमृतपाल सिंगने दिली होती.

अमृतपालच्या अटकेची ही 3 कारणे

1. अमृतपालची पत्नी किरणदीप कौर ही लंडनला निघाली असताना, तिला अमृतसर विमानतळावरच रोखण्यात आले होते. अमृतपालच्या जल्लूखेडातील घरी तिला परत पाठविण्यात आले. अमृतपालवर त्यामुळेही दबाव होता कारण तिच्यावर अटकेची टांगती तलवार होती.

2. अमृतपालचा मित्र पपलप्रीत याला अटक झाल्यानंतर अमृतपालला लपायला कुठे जागा नव्हती.

3. अमृतपाल हा व्यवसायानिमित्त वर्षानुवर्षे याआधी दुबईला राहिलेला होता. तो नुकताच दुबईहून पंजाबात परतलेला असल्याने, त्याचे वैयक्तिक नेटवर्क मूळ गावाकडे फार असे नव्हतेच.

पोलिसांसमोर पाठाला बसला

पोलिस आले तेव्हा अमृतपाल गुरुद्वार्‍यात पाठ करायला बसला होता. पोलिस अधिकारी बाहेरच थांबले होते. गुरुद्वारा साहिबची मर्यादा पोलिसांनी राखली.

Back to top button