कुस्तीपटूंनी पुन्‍हा ठोकला महासंघाविरुद्ध शड्डू! जंतर-मंतरवर निदर्शने | पुढारी

कुस्तीपटूंनी पुन्‍हा ठोकला महासंघाविरुद्ध शड्डू! जंतर-मंतरवर निदर्शने

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : देशातील अव्वल कुस्तीपटू बजरंग पुनिया, साक्षी मलिक आणि विनेश फोगट यांच्यासह इतर कुस्तीपटूंनी भारतीय कुस्ती महासंघाचे प्रमुख ब्रिजभूषण शरण सिंह यांचा निषेध करण्यासाठी आजपासून ( दि. २३ ) पुन्हा जंतरमंतरवर निदर्शने सुरु केली आहेत.

ब्रिजभूषण यांच्‍यावर गंभीर आरोप

जंतर-मंतरवर कुस्‍तीपटूंनी १८ जानेवारी २०२३ रोजी आंदोलन केले होते. यावेळी त्‍यांनी ब्रिजभूषण शरण सिंह आणि महासंघावर लैंगिक शोषण, मानसिक छळ, जीवे मारण्याच्या धमक्या आणि आर्थिक गैरव्यवहार यासह विविध आरोप केले होते.त्यानंतर क्रीडा मंत्रालयाने हस्तक्षेप केला आणि कुस्तीपटूंच्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी आणि WFI च्या दैनंदिन कामकाजाचा ताबा घेण्यासाठी एक तपास समिती स्थापन केली होती. पर्यवेक्षण समिती स्थापन करण्याआधी सरकारने त्यांच्याशी सल्लामसलत केली नाही, असाही दावा त्‍यानी केला होता.

आजच्‍या निदर्शनात ऑलिम्पिक पदक विजेते बजरंग पुनिया, साक्षी मलिक आणि दुहेरी विश्व चॅम्पियनशिप पदक विजेती विनेश फोगट यांच्यासह भारताचे अव्वल कुस्तीपटूंचा समावेश आहे. ब्रिज भूषण यांच्यावर सात महिलांचा लैंगिक छळ केल्याचा आरोप करत, ज्यात एका अल्पवयीन मुलीचाही समावेश आहे, कुस्तीपटूंनी सांगितले की त्यांनी दोन दिवसांपूर्वी डब्ल्यूएफआय प्रमुखाविरुद्ध कॅनॉट प्लेस पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती परंतु पोलिसांनी अद्याप एफआयआर दाखल केलेला नाही, असेही त्‍यांनी म्‍हटले आहे.

यावेळी साक्षी मलिक म्हणाली, आम्ही सीपी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार केली. दोन दिवस झाले, पण अद्याप गुन्‍हा दाखल करण्‍यात आलेला नाही. सात महिलांनी तक्रार केली, ज्यात एका अल्पवयीन मुलीचाही समावेश आहे. यामुळे पोस्कोचा गुन्हा दाखल झाला आहे; परंतु अद्याप काहीही केले नाही, असा आरोपही तिने केला.

“तीन महिने झाले तरी आम्हाला न्याय मिळालेला नाही. त्यामुळेच आम्ही न्याय मागण्यासाठी पुन्हा इथे आलो आहोत. जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथेच राहणार आहोत, असे विनेश रविवारी म्हणाली होती.


हेही वाचा : 

Back to top button