

पुढारी ऑनलाईन : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) दौन दिवसांचा देशाच्या विविध भागांचा दौरा करणार आहे. त्यांचा हा दौरा २४ एप्रिलपासून सुरु होईल. पंतप्रधान मोदी यांचा हा दौरा खास असेल कारण ते या दौऱ्यात अवघ्या ३६ तासांत देशाच्या विविध भागांमध्ये सुमारे ५ हजार किमीचा प्रवास करतील. या दौऱ्यादरमयान ते ८ कार्यक्रमांना उपस्थित राहतील आणि त्यासाठी ते ७ वेगवेगळ्या शहरांचा प्रवास करतील.
पंतप्रधानांचा दौरा २४ एप्रिल रोजी दिल्लीतून सुरु होईल. ते पहिल्यांदा मध्य भारतातील मध्य प्रदेशचा दौरा करतील. त्यानंतर ते दक्षिणेत केरळला जातील. त्यानंतर पश्चिमेकडील केंद्रशासित प्रदेशात त्याचा मुक्काम होईल आणि नंतर ते दिल्लीला परत येतील, असे अधिकाऱ्यांनी शनिवारी सांगितले.
पंतप्रधानांच्या दीर्घ दौऱ्याच्या कार्यक्रमाची माहिती देताना अधिकाऱ्यांनी सांगितले की, "पंतप्रधान मोदी २४ एप्रिलला सकाळी प्रवासाला सुरुवात करतील. ते पहिल्यांदा दिल्ली ते खजुराहो असा सुमारे ५०० किलोमीटरचा प्रवास करतील. खजुराहो येथून ते रीवा येथे जातील. तेथे ते राष्ट्रीय पंचायती राज दिन कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. यानंतर ते ये-जा मिळून सुमारे २८० किमी प्रवास करुन खजुराहोला परत येतील. तेथून ते सुमारे १७०० किलोमीटरचा हवाई प्रवास करुन कोचीला पोहोचतील. तेथे ते युवम कॉन्क्लेव्हमध्ये सहभागी होतील."
"दुसऱ्या दिवशी सकाळी पीएम मोदी कोचीतून तिरुअनंतपूरमकडे रवाना होतील. हा प्रवास १९० किमीचा असेल. ते या ठिकाणी वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवतील. तसेच ते येथे विविध प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकापर्ण करतील. येथून त्याचा सूरत मार्गे सिल्वासा पर्यंतचा प्रवास १,५७० किमीचा असेल. तेथे ते नमो मेडिक कॉलेजला भेट देतील आणि विविध प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण करतील," अशीही माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
पीएम मोदी (PM Narendra Modi) पुढे देवका सीफ्रंटच्या उद्घाटनासाठी दमणला जातील. त्यानंतर ते सुमारे ११० किमीचा प्रवास करत सूरतला जातील. सूरतहून ते दिल्लीला परततील. त्यांचा हा प्रवास ९४० किमीचा असेल, असेही सांगण्यात आले आहे. पंतप्रधानांचा हा सुमारे ५,३०० किमीचा विमान प्रवास असेल.
हे ही वाचा :