मुघलांच्या इतिहासानंतर ‘डार्विनचा सिद्धांत’ही वगळला; शिक्षकांसह अनेकांचा NCERT वर आक्षेप | पुढारी

मुघलांच्या इतिहासानंतर 'डार्विनचा सिद्धांत'ही वगळला; शिक्षकांसह अनेकांचा NCERT वर आक्षेप

पुढारी ऑनलाइन डेस्क : नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग (NCERT) ने मुघलांच्या इतिहासानंतर आता दहावीच्या पाठ्यपुस्तकातून चार्ल्स डार्विनचा ‘जैविक उत्क्रांतीचा सिद्धांत’ वगळला आहे. NCERT च्या या कृतीवर 1800 हून अधिक शास्त्रज्ञ आणि शिक्षकांच्या गटाने आक्षेप घेतला आहे आणि हा अध्याय पुनर्संचयित करण्याची केंद्राला विनंती केली आहे.

वगळलेले प्रकरण पुन्हा आणण्यासाठी एनसीआरटीला शिक्षक, शास्त्रज्ञ आणि शिक्षण तज्ज्ञांनी स्वाक्षरी केलेले एक खुले पत्र दिले आहे. स्वाक्षरी करणाऱ्यांमध्ये ब्रेक थ्रू सायन्स सोसायटीचे सर्वात जास्त सदस्य आहेत. याशिवाय टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (TIFR), इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च (IISER) आणि IIT सारख्या संस्थांमधील शास्त्रज्ञांचाही समावेश आहे.

NCERT : कोणकोणते विषय गाळण्यात आले आहे?

NCERT ने युक्तिवाद करत गेल्या वर्षी जाहीर केले होते की दहावीच्या विज्ञानाच्या पाठ्यपुस्तकात असलेला अनुवांशिकता आणि उत्क्रांती हा धडा अनुवांशिकता या नावाने रिप्लेस केला जाईल. मात्र, नवीन पाठ्यपुस्तकात या धड्याचे फक्त नाव बदलले गेलेले नाही. तर धड्यातून “उत्क्रांती”, “अधिग्रहित आणि अनुवांशिक वैशिष्ट्ये”, “उत्क्रांती संबंधांचा शोध घेणे”, “जीवाश्म”, “स्टेजद्वारे उत्क्रांती”, “उत्क्रांती प्रगतीशी समतुल्य असू नये” आणि “मानवी उत्क्रांती” हा भाग वगळण्यात आला आहे.

नवीन (2023-24) शैक्षणिक सत्र सुरू झाल्यावर तर्कसंगत सामग्री असलेली नवीन पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली. त्यानंतर ही बाब उघड झाली.

NCERT : वगळलेला भाग पुनर्संचयित करण्याची तज्ज्ञांची मागणी

अनुवांशिकता धड्यातून गाळण्यात आलेला हा भाग पुनर्संचयित करण्यासाठी अनेक शिक्षक, शिक्षण तज्ज्ञ, शास्त्रज्ञ यांनी मागणी केली आहे. पत्रात स्वाक्षरी करणाऱ्या ब्रेक थ्रू सोसायटीच्या सदस्यांनी म्हटले आहे की, उत्क्रांतीची प्रक्रिया समजून घेणे “वैज्ञानिक स्वभाव तयार करण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे” आणि विद्यार्थ्यांना या प्रदर्शनापासून वंचित ठेवणे ही एक प्रकारे “शिक्षणाची फसवणूक.” आहे.

ब्रेक थ्रू सायन्स सोयाटीचे तेलंगणा राज्य उपाध्यक्ष देवर्षी गांगजी म्हणाल्या की, विज्ञानाच्या या मूलभूत शोधापासून वंचित राहिल्यास विद्यार्थी गंभीरपणे अपंग राहतील.

शास्त्रज्ञांचे मत

शास्त्रज्ञांनी सांगितले की, सध्याच्या रचनेत, केवळ 11वी आणि 12वीच्या वर्गात फारच कमी विद्यार्थी विज्ञान प्रवाहाची निवड करतात आणि त्यापैकी एक लहान भाग जीवशास्त्र हा अभ्यासाचा विषय म्हणून निवडतो.

“त्यामुळे अशा प्रकारे, दहावीपर्यंतच्या अभ्यासक्रमातून मुख्य संकल्पना वगळण्यात आल्याने बहुसंख्य विद्यार्थी या क्षेत्रातील अत्यावश्यक शिक्षणाचा महत्त्वपूर्ण भाग गमावतील,” असे पत्रात म्हटले आहे.

हे ही वाचा :

Maruti Suzuki च्या ‘बलेनो आरएस’मध्ये आढळला दोष, ७,२१३ कार्स परत मागवल्या

Covid-19 updates : धोका कायम! कोरोनाचे २४ तासांत १२,१९३ नवे रुग्ण, सक्रिय रुग्णसंख्या ६७,५५६ वर

Back to top button