जवानांवर केलेल्या हल्ल्यात होते तिघे परदेशी दहशतवादी; रॉकेट प्रोपेल्ड ग्रेनेडचा हल्ल्यासाठी वापर | पुढारी

जवानांवर केलेल्या हल्ल्यात होते तिघे परदेशी दहशतवादी; रॉकेट प्रोपेल्ड ग्रेनेडचा हल्ल्यासाठी वापर

श्रीनगर; वृत्तसंस्था :  काश्मीरमध्ये गुरुवारी लष्कराच्या ट्रकवर झालेल्या हल्ल्यात पाच जवान शहीद झाले होते. आता या हल्ला प्रकरणी महत्त्वपूर्ण तपशील समोर आला आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्या जवानाने दिलेल्या माहितीनुसार पाच ते सात दहशतवाद्यांनी ट्रकवर रॉकेट प्रोपेल्ड ग्रेनेडने हल्ला केल्याचे स्पष्ट झाले असून त्यातील त्यातील तिघे विदेशी असल्याचे उघड झाले आहे.

या हल्ल्याच्या तपासासाठी राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) आणि 8 सदस्यांचे न्यायवैद्यक पथक पूँछला रवाना झाले आहे. बॉम्बनाशक पथक व स्पेशल ऑपरेशन ग्रुपने तपास सुरू केला असून घटनास्थळ पूँछपासून 90 कि.मी.वर आहे. सुरक्षा दलांनीही हल्ल्याच्या परिसरात शोध मोहीम सुरू केली आहे. या दहशतवादी हल्ल्यात राष्ट्रीय रायफल्स युनिटचे पाच जवान शहीद झाले होते. या हल्ल्याची जबाबदारी पीपल्स अँटी फॅसिस्ट फ्रंटने घेतली आहे.

शहीद जवान ओडिशा आणि पंजाबचे

लान्स नाईक देवाशिष बसवाल, लान्स नाईक कुलवंत सिंग, शिपाई हरकिशन सिंग, शिपाई सेवक सिंग व हवालदार मनदीप सिंग अशी शहीद जवानांची नावे आहेत. यातील लान्स नायक बसवाल ओडिशाचे असून, उर्वरित चौघे शहीद पंजाबचे आहेत.

जी-20 बैठकीची पार्श्वभूमी

श्रीनगरमध्ये 22 ते 24 मेपर्यंत जी-20 च्या पर्यटन कार्यगटाची बैठक होणार आहे. या बैठकीच्या तयारीला खीळ घालण्यासाठी दहशतवाद्यांनी हा हल्ला केला असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. दरम्यान, संरक्षण तज्ज्ञ मेजर जनरल (निवृत्त) पी. के. सहगल यांनी, पुरेशी दक्षता न घेतल्याच्या कारणास्तव हा हल्ला झाल्याचा दावा केला आहे.

Back to top button