Terrorists Attack : काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यात 5 जवान शहीद | पुढारी

Terrorists Attack : काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यात 5 जवान शहीद

श्रीनगर, पुढारी वृत्तसेवा : Terrorists Attack : जम्मू-काश्मीरच्या राजौरी सेक्टरमधील भिंबरगली आणि पूँछदरम्यान लष्करी वाहनावर गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास दहशतवाद्यांनी केलेल्या ग्रेनेड हल्ल्यात पाच जवान शहीद झाले. या हल्ल्यात ट्रक जळून भस्मसात झाला आहे.

जम्मू-काश्मीरमधील पीपल्स अँटी फॅसिस्ट फ्रंट या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. लष्करी प्रवक्त्याने सांगितले की, जोरदार पावसामुळे द़ृश्यमानता कमी होती. याचा फायदा घेत दहशतवाद्यांनी ट्रकच्या दिशेने ग्रेनेड फेकले आणि गोळीबारही केला. उपलब्ध माहितीनुसार दहशतवाद्यांनी 50 गोळ्या ट्रकवर झाडल्या. त्यानंतर काही मिनिटांतच ट्रक जळून खाक झाला. शहीद झालेले पाच जवान दहशतवादविरोधी मोहिमेसाठी तैनात होते. या हल्ल्यात एक जवान गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर राजौरीच्या लष्करी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

लष्कराच्या प्रवक्त्याने शहीद झालेल्या जवानांची नावे सांगण्यास तूर्त नकार दिला आहे. यासंदर्भात तत्काळ चौकशी सुरू करण्यात आली आहे. चौकशीचा अहवाल आल्यानंतर या घटनेवर आणखी प्रकाश पडू शकेल, असेही सांगण्यात आले. तत्पूर्वी, प्राथमिक तपासात हा अपघात वीज कोसळल्यामुळे घडल्याचा दावा केला जात होता. दुर्घटना घडली ते ठिकाण पूँछहून 90 कि.मी. अंतरावर आहे. लष्कराच्या ट्रकला आग लागल्याची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरू केले. त्यानंतर लष्कराचे अधिकारी तेथे दाखल झाले.

Terrorists Attack : यापूर्वीही अशाच घटना

गत 11 जानेवारी रोजी जम्मू काश्मीरच्या कुपवाड्यातील माछिल सेक्टरमध्ये लष्कराचा 1 अधिकारी व 2 जवान शहीद झाले होते. हे तिघेही भारतीय लष्कराच्या चिनार कोअरचे सैनिक होते.

गेल्या डिसेंबरमध्ये सिक्कीममधील जेमा येथे लष्कराचा ट्रक दरीत कोसळला होता. त्यात 16 जवान शहीद झाले होते. लष्कराच्या आणखी 2 व्हॅन होत्या. तिन्ही वाहने चटनहून थंगूच्या दिशेने निघाली होती. रस्त्यात एका वळणावर ट्रक घसरून दरीत कोसळला. या अपघातात 4 जवान गंभीर जखमी झाले होते. त्यांना नंतर एअरलिफ्ट करण्यात आले होते.

गेल्या वर्षी राजस्थानातील उदयपूर येथे लष्करी वाहनाला तांत्रिक कारणावरून आग लागली होती. सुदैवाने त्यात कोणी मृत अथवा जखमी झालेले नव्हते. त्यापूर्वी म्हणजेच 2021 मध्ये राजस्थानातील गंगानगर जिल्ह्यात लष्करी वाहनाला आग लागून तीन जवान शहीद झाले होते. भटिंडा येथे एका जवानाने आपल्यास सहकार्‍यांवर गोळीबार केल्याची घटना तर गेल्या आठवड्यातच घडली होती.

Back to top button