

लखनौ; वृत्तसंस्था : यूपीचा माफिया डॉन अतीक अहमद हा करैली शहरात मुस्लिमांच्या वस्त्यांवर वस्त्या वाढवून शहराची डेमोग्राफी बदलण्याच्या प्रयत्नात होता. त्याच्या टोळीतील शूटर्ससाठी सुरक्षित कवच आणि स्वत:साठी निवडून येण्याची सोय, हे हेतू अतीकचे होते, असे पोलिस तपासातून समोर आले आहे. सध्या फरार असलेला गुड्डू मुस्लिम हा अतीकच्या टोळीतील सर्वांत धोकेदायक गुंड आहे, असेही पोलिसांनी सांगितले.
करैली मुस्लिमबहुल व्हावे म्हणून अतीकची संपूर्ण टोळी झटत होती. शूटर्सना याच भागात वसविले जात होते. गुड्डू मुस्लिम इथेच राहात होता. या भागात प्लॉट खरेदीचा व इमारतींच्या बांधकामांचा सपाटाच अतीकने लावलेला होता. अतीकला या भागातून अन्य धर्मियांना घालवून लावायचे होते, असे एसटीएफ एडीजी अमिताभ यश यांनी सांगितले.
अतीकचा मुलगा असद याला टोळीची कमान आपल्या हाती घ्यायची होती. त्याच्यावर आधी एकच गुन्हा दाखल असल्याने हे टोळीप्रमुख होण्यासाठी पुरेसे नव्हते म्हणून उमेश पाल हत्याकांडात तो स्वत: सहभागी झाला होता, असे अमिताभ यश म्हणाले.
उत्तर प्रदेशातील अतिक अहमद , अशरफ अहमद यांच्या मृत्यू संदर्भातील होर्डिंग लावणार्या दोघांना अटक करण्यात आली. त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी न्यायालयाने दिली आहे. पोलिसांनी नसिर अब्दुल शेख, शेख वाजेद युनुस, सुमेर सिद्दीकी, मोहसिन युनुस पटेल यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले.
यूपीचा माफिया डॉन अतीक अहमद आणि अशरफ यांचे मारेकरी लवलेश, सनी आणि अरुण यांना बुधवारी सकाळी प्रयागराज न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना 4 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. बुधवारीच प्रयागराज पोलिसांनी अतीक टोळीतील शूटर असद कालिया याला अटक केली. त्याच्यावर 50 हजारांचे बक्षीस होते. दरम्यान, याप्रकरणी उत्तरप्रदेश सरकारने 5 पोलीसांना निलंबित केले आहे.