Happiest state: ‘हे’ आहे भारतातील सर्वात ‘आनंदी राज्य’; जाणून घ्या आनंदी असण्याची कारणे | पुढारी

Happiest state: 'हे' आहे भारतातील सर्वात 'आनंदी राज्य'; जाणून घ्या आनंदी असण्याची कारणे

पुढारी ऑनलाईन डेस्क : आनंदी राहण्‍यासाठी तुम्‍ही समाधानी असणे आवश्‍यक आहे, हे वाक्‍य तुम्‍ही असंख्‍य वेळा ऐकले असेल. तसेच सर्वाधिक आनंदी माणसांचा देश यासंदर्भातील वाचलं असेल. आता भारतातील सर्वात आनंदी राज्‍य कोणते ? असा प्रश्‍न काहींना पडला असेल. याचे उत्तर शोधण्‍याचा प्रयत्‍न गुरुग्राममधील मॅनेजमेंट डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूटमधील अभ्‍यासक प्रा. राजेश के पिलानिया यांनी आपल्‍या सर्वेक्षणातून केला आहे. त्‍यांनी केलेल्‍या पाहणीनुसार, मिझोराम हे देशातील सर्वात आनंदी राज्‍य असल्‍याचे निदर्शास आले आहे. (Happiest state) जाणून घेवूया त्‍यांनी काढलेल्‍या निष्‍कर्षांविषयी…

Happiest state : मिझोराममधील माणसं आनंदी कशी ?

तुम्हाला प्रश्न पडला असेल की, मिझोरम राज्य कोणत्या घटकाच्या आधारे आनंदी राज्य घोषीत केले आहे? तर मिझोरमचा आनंद निर्देशांक कौटुंबिक नातेसंबंध, कामाशी संबंधित समस्या, सामाजिक समस्या आणि परोपकार, धर्म, आनंदावर कोविड-19 चा परिणाम आणि शारीरिक आणि मानसिक आरोग्य या सहा घटकांवर आधारित असल्‍याचे या अहवालात म्‍हटलं आहे.

अत्‍यंत कठीण परिस्‍थितीतही विद्यार्थ्या भविष्‍याबाबत आशावादी

राजेश के पिलानिया यांनी केलेल्या अहवालात म्हटलं आहे की, “मिझोराममधील आयझॉल येथील सरकारी मिझो हायस्कूल (GMHS) च्या एका विद्यार्थ्याला त्याच्या वडिलांनी लहान असतानाच आपल्या कुटुंबाचा त्याग केला. त्यामुळे त्याला अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. अत्‍यंक कठीण परिस्‍थितीही तो आशावादी आहे. तो त्याच्या अभ्यासात अव्वल आहे. तो आपल्या अभ्यासात कशी प्रगती करु याबद्दल  आशावादीही आहे. त्याला चार्टर्ड अकाउंटंट किंवा सिव्हिल सर्व्हिसेसच्या परीक्षेला बसायच आहे.

त्याचप्रमाणे, GMHS मधील इयत्ता दहावीत  शिकणारा विद्यार्थी, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA) मध्ये जाण्याची इच्छा व्यक्त करतो.  त्याचे वडील दुधाच्या कारखान्यात काम करतात तर आई गृहिणी आहे. दोघेही त्याच्या शाळेमुळे त्यांच्या भविष्याबद्दल आशावादी आहेत. एका विद्यार्थ्याने सांगितले की, “आमचे शिक्षक आमचे चांगले मित्र आहेत, आम्ही त्यांच्याशी काहीही शेअर करण्यास घाबरत नाही किंवा लाजत नाही,” तर मिझोराममधील शिक्षक नियमितपणे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांशी भेटून त्यांना येणाऱ्या समस्या सोडवतात.

happiest state : मिझोरामची सामाजिक संरचनाही ठरली कारणीभूत

या अहवालानूसार, एबेन-एझर बोर्डिंग स्कूल या खासगी शाळेच्या शिक्षिका सिस्टर लालरिनमावी खिआंगटे सांगतात, मिझोरामच्या सामाजिक संरचनेचाही तरुणांच्या आनंदी जगण्‍यात मोठा वाटा आहे. अभ्यासासाठी पालकांचा दबाव कमी आहे. मिझो समुदायातील प्रत्येक मूल, कोणताही लिंगभेदाची पर्वा न करता, लवकर कमाईवर भर देते. कोणतेही काम खूप लहान मानले जात नाही आणि तरुणांना साधारणत १६ किंवा १७  वर्षांच्या आसपास रोजगार मिळतो. पालकही त्‍याला प्रोत्साहन देतात. विशेष म्‍हणजे मुली आणि मुलांमध्ये कोणताही भेदभाव केला जात नाही.

मिझोराममध्ये विभक्त कुटुंबांची संख्या जास्त आहे, परंतु अशाच परिस्थितीत अनेक समवयस्क असणं, काम करणार्‍या माता आणि लहानपणापासूनच आर्थिक स्वावलंबी असणं म्हणजे मुलं वंचित राहत नाहीत, त्‍यामुळे कौटुंबिक वातावरण खेळीमेळीचे राहते, असाही निष्‍कर्ष या पाहणीत नोंदवण्‍यात आला आहे.

हेही वाचा

 

Back to top button