नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : ग्रामपंचायतींमध्ये सर्वसमावेशक विकास करणाऱ्या राज्यातील ५ ग्रामपंचायतींना नुकतेच 'राष्ट्रीय पंचायत पुरस्कारा'ने सन्मानित करण्यात आले.राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सांगली जिल्ह्यातील खंडोबाचीवाडी, कुंडल आणि पुणे जिल्ह्यातील टिकेकरवाडी या ग्रामपंचायतींना प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर, छत्रपती संभाजीनगर जिल्हयातील पाटोदा ग्रामपंचायतीला द्वितीय क्रमांकाच्या आणि कोल्हापूर जिल्ह्यातील अलाबाद या ग्रामपंचायतीला तृतीय क्रमांकाच्या पुरस्काराने केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांच्या हस्ते गौरविण्यात आले. ( National Panchayat Awards )
केंद्रीय ग्रामीण विकास व पंचायती राज विभागाच्यावतीने १७ ते २१ एप्रिलपर्यंत 'राष्ट्रीय पंचायत पुरस्कार सप्ताह' साजरा करण्यात येत आहे. या अंतर्गत राष्ट्रीय पंचायत पुरस्कार समारंभ आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमास राष्ट्रपती यांच्यासह केंद्रीय ग्रामीण विकास व पंचायत राज मंत्री गिरिराज सिंह,केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील प्रामुख्याने उपस्थित होते.
संयुक्त राष्ट्राने ठरविलेल्या विविध ९ श्रेणीतील सतत विकासाच्या मानकांनुसार द्रारिद्रयमुक्त आणि सुधारित उपजीवीका श्रेणीत सर्वोत्कृष्ट कार्य करण्यासाठी सांगली जिल्ह्यातील तालुका पलुस येथील खंडोबाचीवाडी आणि स्वच्छ आणि हरित पंचायत म्हणुन कुंडल या ग्राम पंचायतींना सन्मानित करण्यात आले. यासह दोन्ही ग्रामपंचायतींच्या बँक खात्यात थेट प्रत्येकी एक कोटी रूपयांची रकम जमा करण्यात आली.या छोट्याशा गावाने महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम व स्वावलंबी करण्यासाठी २८ बचत गटांची निर्मीत केली. या माध्यमातून गावातील महिलांना २८ लाखांचे कर्जवाटप करण्यात आले. तर, स्वच्छ आणि हरित पंचायत या श्रेणीतील सर्वोत्कृष्ट कार्य केल्याबद्दल कुंडल ग्राम पंचायतीला गौरविण्यात आले.
पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील टिकेकरवाडी या ग्रामपंचायतीला ग्राम ऊर्जा स्वराज विशेष पंचायत पुरस्कार प्रदान करण्यात आला. या ग्राम पंचायतीने सोलर पॅनल, पवनचक्की, बॉयोगॅसच्या माध्यमातून १५ हजार वॅट विद्युत निर्मित केली.त्यांच्या या उल्लेखनीय कार्यासाठी ग्रामपंचायतीचा गौरव झाला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाटोदा ग्रामपंचायतीला कार्बन न्युट्रल विशेष पंचायतीचा व्दितीय क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.कार्बनडाय ऑक्साइडचे प्रमाण कमी करण्यासाठी या ग्रामपंचायतीने नावीण्यपूर्ण योजना राबविल्या आहेत.प्रदूषण मुक्त गाव होण्याचा मान या ग्रामपंचायतीला मिळालेला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यामधील अलाबाद या ग्रामपंचायतीला महिला अनुकूल पंचायत या श्रेणीतील तृतीय क्रमांकाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. पुरस्कार सरपंच लता कांबळे, ग्रामसेवक अनिकेष पाटील यांनी स्वीकारला. आलाबादची लोकसंख्या १८८३ असून महिलांची संख्या ८४८ असून ती ५०% पेक्षा जास्त आहे. ग्रामपंचायत आलाबादने महिला सक्षमीकरण आणि बाल विकासावर काम केले.
हेही वाचा :