मुलांच्या कोरोना लसीकरणाचा मार्ग मोकळा होणार; तज्ज्ञांकडून कोव्हॅक्सिनची शिफारस - पुढारी

मुलांच्या कोरोना लसीकरणाचा मार्ग मोकळा होणार; तज्ज्ञांकडून कोव्हॅक्सिनची शिफारस

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

मुलांच्या कोरोना लसीकरणाचा मार्ग मोकळा होण्याच्या दृष्टीने एक महत्वाची घडामोड आज ( दि. १२ ) घडली. तज्ज्ञ समितीकडून २ ते १८ या वयाेगटातील मुलांसाठी भारत बायोटेकची कोरोना लस कॉव्हॅक्सिनची शिफारस केली आहे. यावर अंतिम परवानगी ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया देणार आहे. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडून परवानगी मिळाली तर मुलांसाठीच्या कोरोना लसीला मान्यता मिळणारी कोव्हॅक्सिन ही दुसरी लस ठरेल. यापूर्वी ऑगस्ट महिन्यात १२ वर्षावरील मुलांसाठी झायडस कॅडिलाच्या तीन डोस डीएनएला परवानगी मिळाली होती.

भारतात मुलांच्या लसीकरणासाठी सीरम इन्स्टिट्युटच्या नोव्हावॅक्स या तिसऱ्या लसीलाही मान्यता मिळण्याची शक्यता आहे. डीसीजीआयने गेल्या महिन्यात ७ ते ११ वर्षा दरमन्यानच्या मुलांसाठी या लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांना परवानगी दिली आहे. तर बायोलॉजिकल इच्या कोर्बेवॅक्स या लसीलाही ५ वर्षावरील लहान मुलांच्या ॲडव्हान्स चाचण्यांना परवानगी मिळाली आहे.

मुलांच्या कोरोना लसीकरणाचा मार्ग

गेल्या आठवड्यात भारत बायोटेकने सांगितले होते की, त्यांनी २ ते १८ वर्षामधील मुलांवर केलेल्या लसीकरण चाचण्यांचा सर्व डाटा हा जमा केला आहे. कोव्हॅक्सिनने प्रौढ लोकांसाठी वापरला होता तोच फॉर्म्युला मुलांसाठीच्या लसीकरणासाठी वापरला जाईल. पण, जर फॉर्म्युला एकच असला तरी मुलांच्या सुरक्षेसाठी आणि प्रभाव तपासण्यासाठी आधी चाचण्या होणे गरजेचे होते.

सध्या तरी या चाचण्याचा डाटा सार्वजनिक करण्यात आलेला नाही. मात्र देशभरातील जवळपास १ हजार पेक्षा जास्त मुलांवर या लसीची चाचणी घेण्यात आली आहे. भारत हळूहळू लहान मुलांच्या लसीकरणाकडे वळत आहे. त्यामुळे काही काळातच मुलांच्या कोरोना लसीकरणाचा मार्ग मोकळा होण्याची चिन्हे दिसत आहेत. देशभरात आज घडीला जवळपास ९६ कोटी लसींचे डोस देशातील प्रौढ लोकांना देण्यात आले आहेत.

दिल्ली एम्सचे प्रमुख डॉ. रणदीप गुरेरिया यांनी २ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण करण्यात यावे यावर भर दिला आहे. कारण याच मार्गाने आपण कोरोना महामारीपासून आपली सुटका करुन घेऊ शकतो असे ते म्हणाले. या महिन्याच्या सुरुवातीला भारतीय लसीकरण टास्क फोर्सच्या डॉ. एनके अरोरा यांनी सांगितले होते की, मुलांचे कोरोना लसीकरण सुरु करताना पहिल्यांदा जी मुले व्याधीग्रस्त आहेत त्यांना प्राधान्य देण्यात येईल. त्यानंतर सदृढ मुलांचे लसीकरण सुरु करण्यात येईल.

मुलांच्या कोरोना लसीकरणाचा मार्ग : व्याधीग्रस्त मुलांना प्राधान्य

एनके अरोरा म्हणाल्या की, ‘आम्ही हाय रिस्कमधील मुलांची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहोत. येत्या दोन आठवड्यात आम्ही संबंधित यादी सार्वजनिक करु. मुलांना लसीकरणासाठी फार प्रवास करावा लागणार नाही याचीही व्यवस्था करण्याचा प्रयत्न करत आहोत.’

देशातील अनेक राज्यांमध्ये शाळा पुन्हा सुरु झाल्या आहेत. अनेक विद्यार्थी आणि शिक्षक शाळेत परतत आहेत.  जर कोरोना रुग्णसंख्या वाढू लागली तर त्यामध्ये मुलांची संख्या जास्त असण्याची दाट शक्यता आहे.

१३० कोटी लोकसंख्या असलेल्या भारतात सध्या पूर्ण लसीकरण झालेल्यांची संख्या ही ३० कोटीपेक्षाही कमी आहे. दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनने ( WHO ) कोव्हॅक्सिनला आपत्कालीन वापरासाठीची परवानगी दिलेली नाही. आता जागतिक आरोग्य संघटनने भारत बायोटेककडे अधिकचा डाटा मागवला आहे. जागतिक आरोग्य संघटनेचा निर्णय पुढच्या आठवड्यात येण्याची शक्यता आहे.

जर जागतिक आरोग्य संघटनेने आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिली तर कोव्हॅक्सिनला कोरोनावरील लस म्हणून जवळपास सर्वच देशांमध्ये मान्यता मिळेल.

Back to top button