डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा देशातील सर्वात उंच पुतळा हैदराबादेत | पुढारी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा देशातील सर्वात उंच पुतळा हैदराबादेत

हैदराबाद; सुमेध बनसोड :  महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त तेलंगणा सरकारने हुसेन सागर परिसरात उभारलेल्या देशातील सर्वात 125 फूट उंच डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी शुक्रवारी केले. यावेळी भारिप-बमसंचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर उपस्थित होते. अनावरणावेळी खास हेलिकॉप्टरमधून पुतळ्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. राज्य मंत्रिमंडळातील सर्व मंत्री, पक्षाचे आमदार, खासदार कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित होते.

भारतीय राष्ट्रीय समितीचे (बीआरएस) सर्वेसर्वा के. चंद्रशेखर राव यांच्या सरकारने अनिसूचित जाती, अनुसूचित जमाती तसेच इतर मागासवर्गीयांसाठी केलेल्या कामांचा तपशील या कार्यक्रमातून देण्यात आला. जय भीम, जय भीम, केसीआर जिंदाबाद, देश का नेता कैसा हो, केसीआर जैसा हो अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. गाव, जिल्हा, राज्य, देशच नव्हे तर अवघ्या जगाला बाबासाहेबांनी एक दिशा दिली, अशा शब्दांत केसीआर यांनी डॉ. आंबेडकरांना अभिवादन केले. कुणाच्या मागणीची पूर्तता करण्यासाठी नव्हे, तर डॉ. बाबासाहेबांच्या विचारांचे स्मरण सदैव राहावे यासाठी हा भव्य पुतळा उभारल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. राज्याच्या नवीन सचिवालयालादेखील बाबासाहेबांचे नाव दिले जाईल, अशी घोषणा त्यांनी यावेळी प्रचंड जनसमुदायाच्या उपस्थितीत केली.

हैदराबादला देशाची दुसरी राजधानी बनवण्याची गरज : प्रकाश आंबेडकर

देशाच्या संविधान सभेच्या चर्चे दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हैदराबादला देशाची दुसरी राजधानी असावी, असे मत मांडले होते. याबद्दल पुढे प्रयत्न झाले नाहीत. तेलंगणाने पुन्हा ही मागणी लावून धरावी, असे जाहीर आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्र्यांना केले.

11.08 एकर परिसरात भव्य स्मारक

हैदराबादेत सचिवालयाच्या शेजारी असलेल्या एनटीआर गार्डन परिसरात हा भव्य पुतळा 11.08 एकर परिसरात उभारण्यात आला आहे. 50 फूट उंच बेसमेंटवर हा पुतळा असून, त्याचे वजन 456 टन आहे. हे स्मारक शहराच्या सौंदर्यात भर घालत आहे. विशेष म्हणजे राम सुतार आणि अनिल सुतार यांनी हा पुतळा साकारला आहे.

Back to top button