हात-पाय निकामी, नाकाने चालवतो मोबाईल, लॅपटॉप; सरकारी नोकरीच्या 3 ऑफर ..पण उद्दिष्ट यूपीएससीचे | पुढारी

हात-पाय निकामी, नाकाने चालवतो मोबाईल, लॅपटॉप; सरकारी नोकरीच्या 3 ऑफर ..पण उद्दिष्ट यूपीएससीचे

राजकोट; वृत्तसंस्था :  तो तीन महिन्यांचाच होता तेव्हा आई-बाबांना त्याला न्यूरोलॉजिकल डिसिज असल्याचे समजले. त्याचे हात, पाय असूनही उपयोगाचे नाहीत. आधी पाय निकामी झाले, पण व्हीलचेअरवर बसून भागत होते. मोबाईल, लॅपटॉपवर तो अभ्यास करत असे. पुढे हातही निकामी झाले. शरीराने खंगला, पण मनाने खचला नाही. नाक-ओठांनी मोबाईल, लॅपटॉप चालविणे शिकला. बारावीत सर्वसामान्यांमध्ये राज्यात तिसरा आणि दिव्यांगांतून पहिला आला. त्याला सरकारी नोकर्‍यांच्या तीन ऑफरही आल्या, पण त्याला यूपीएससी करायचे आहे… गुजरातच्या राजकोटमधील स्मित चांगेला या युवकाची ही जिद्द.

तो लॅपटॉप, मोबाईलवर नाकानेच, लिहायचा तो मजकूरही ऑपरेट करतो. तेही वेगात व अचूक. ओठांनी मोबाईलचा स्क्रीन स्क्रोल करतो. तो 18 वर्षांचाच आहे. ऑनलाईन व्यवसाय करतो. स्वावलंबी आहे. त्याच्या आई स्मिताबेन चांगेला म्हणतात आम्हा दोघांना स्मितचे आई-बाबा असण्याचा अभिमान वाटतो.

नाकाने मोबाईल आणि लॅपटॉप चालवणारा कदाचित मी पहिलाच असावा. मला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये माझे नाव नोंदवायचे आहे.
– स्मित चांगेला, राजकोट

Back to top button