

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : अस्तित्वाच्या 100 वर्षांवर कालावधी ओलांडलेली देशात 234 धरणे असून, अशी सर्वाधिक 63 धरणे मध्य प्रदेशात आहेत. वयाची 150 ते 1300 वर्षे ओलांडलेली 14 धरणे देशात आहेत. यातील 4 धरणे महाराष्ट्रात आहेत. संसदेच्या स्थायी समितीने याबाबात सतर्कतेचा इशारा दिल्यानंतर जलसंपदा मंत्रालयाने सुरक्षा लेखापरीक्षण सुरू केले आहे.
या सर्व धरणांच्या सुरक्षेबाबतचा संपूर्ण आढावा घेऊन 3 महिन्यांत अहवाल तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कालबाह्य झालेली ही धरणे पाडून नद्यांचा प्रवाह पूर्ववत करण्यासाठी कोणतीच यंत्रणा नाही. ती तयार करावी. कालबाह्य धरणांबाबत निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा संसदीय समितीने व्यक्त केली आहे.
राज्य धरण वय
कर्नाटक थोण्णूर टँक 1300
आंध्र प्रदेश कुंबूम टँक 523
राजस्थान स्वरूप सागर 463
राजस्थान उदयसागर 438
राजस्थान राजसमंद 347
राजस्थान जयसमंद 293
उत्तर प्रदेश बरुआ सागर 329
उत्तर प्रदेश मगरपूर 329
उत्तर प्रदेश पचवाडा लेक 329
ओडिशा जगन्नाथ सागर 242
महाराष्ट्र धामापूर (सिंधुदुर्ग) 433
महाराष्ट्र कळपविहीर (बुलडाणा) 223
महाराष्ट्र मुडाना (यवतमाळ) 223
महाराष्ट्र भुशी (लोणावळा, पुणे) 163
वास्तविक केंद्र सरकारने 2 वर्षांपूर्वी धरण सुरक्षा कायदा पारित केला होता. राष्ट्रीय धरण सुरक्षा प्राधिकरणही स्थापन केले. निधी मात्र केवळ 12 कोटी रुपये देण्यात आला होता.