माणसांहून सरस, माझा हा सारस! | पुढारी

माणसांहून सरस, माझा हा सारस!

कानपूर; वृत्तसंस्था :  आरिफ हा माणूस आणि सारस हा एक पक्षी… हा सारस आरिफला मृतप्राय अवस्थेत एके ठिकाणी आढळतो. आरिफ त्याच्यावर उपचार करतो. त्याला खाऊ-पिऊ घालतो. दोघांना एकमेकांचा असा लळा लागतो की, मग ते एकमेकांशिवाय राहात नाहीत. पुढे दोघांच्या मैत्रीत कायदा आडवा येतो… दोघा मित्रांचा नाईलाज होतो. दोघांची ताटातूट होते. आरिफच्या अश्रूंचा बांध फुटतो… आणि 20 दिवसांनी दोघांची पुनर्भेट होते…

कदाचित ही शेवटची भेट असेल, असे माणूस म्हणून सारसला पाहताच आरिफला वाटते आणि त्याला पुन्हा रडू कोसळते. सारसला मात्र अरे मित्र आरिफ पुन्हा भेटला म्हणून कोण आनंद होतो. तो उड्या मारू लागतो…

दोघांच्या मैत्रीची कथा आणि व्यथा अशी : अमेठीलगतच्या गावचा आरिफखान गुर्जर… एक सारस त्याला जखमी अवस्थेत आढळला… आरिफने त्याची सेवाशुश्रूषा केली. मोडलेला पाय जोडला. जखमा भरल्या. या वन्य पक्ष्याला त्याने मोठ्या मायेने खाऊ घातले. पक्ष्याला त्याचा लळा लागला. दोघे सोबत जेवू लागले. सोबत निजू लागले. आरिफखान मोटारसायकलवरून कुठेही निघाला की, वरून सारस उडत उडत त्याची सोबत करू लागला. दिवसागणिक ही मैत्री घट्ट होत गेली.

संपूर्ण यूपीत या मैत्रीची चर्चा होऊ लागलीि. पुढे देशभर ती पसरली. सारस हा यूपीचा राज्यपक्षी आहे. संरक्षित पक्षी आहे. कायद्याने तो पाळता येत नाही. वन विभागाचे कर्मचारी आरिफच्या घरी आले. सारसला ताब्यात घेतले आणि आरिफविरोधात वन अधिनियमाचा भंग केला म्हणून कायदेशीर कारवाईही केली. आता सारस कानपूरच्या प्राणी संग्रहालयात आहे.

मंगळवारी आरिफ आणि सारस तब्बल 20 दिवसांच्या अंतरानंतर भेटले. आमदार अमिताभ बाजपेयीही आरिफसोबत होते. सारसला पाहताच आरिफला रडू कोसळले आणि आरिफला पाहताच सारस आनंदाने कुंपणात उड्या मारू लागला. दोघांच्या या भेटीचा 2 मिनिट 15 सेकंदाचा व्हिडीओही व्हायरल झाला.

वन विभागाने माझ्या मित्राला (सारस) किमान पक्षी अभयारण्यात सोडावे, अशी माझी इच्छा आहे.
– आरिफखान गुर्जर, अमेठी

Back to top button