

पुढारी ऑनलाईन डेस्क : विधानसभा निवडणुकीपूर्वी राजस्थान काँग्रेसमधील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. 2018 च्या विधानसभा निवडणुकीपासून मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यावर नाराज असलेले काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी पुन्हा आक्रमक भूमिका घेतली आहे. जयपूर येथील हुतात्मा स्मारकावर पायलट (Sachin Pilot) लाक्षणिक उपोषण सुरु केले आहे. पायलट यांच्या उपोषणावर काँग्रेसने टीका केली आहे. राजस्थानचे प्रभारी सुखजिंदर सिंग रंधावा यांनी पायलट यांना पक्षविरोधी कारवाया करत असल्याचा आरोप केला आहे.
दरम्यान, सचिन पायलट (Sachin Pilot) यांनी आज (दि.११) जयपूर येथील हुतात्मा स्मारकावर उपोषणाला सुरूवात केली. व्यासपीठावर गांधीजींचा फोटो लावण्यात आला आहे. राष्ट्रपिता यांचे आवडते भजन 'वैष्णव जन तो…' वाजवले जात आहे. उपोषण सुरू करण्यापूर्वी पायलट यांनी ज्योतिबा फुले यांना आदरांजली वाहिली. तसेच वसुंधरा राजे यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारच्या काळात झालेल्या कथित भ्रष्टाचारावर कारवाई करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. उपोषणातून आपला संदेश देणार असल्याचे पायलट यांनी स्पष्ट केले आहे. उपोषणादरम्यान ते कार्यकर्त्यांना संबोधित करणार नाहीत किंवा माध्यमांशी संवाद साधणार नाहीत. परंतु, सायंकाळी ५ नंतर ते माध्यमांशी बोलणार असल्याचे सांगितले जात आहे.
राजस्थान प्रदेश काँग्रेसचे प्रभारी सुखजिंदर रंधावा यांनी सचिन पायलट यांच्याशी फोनवर चर्चा केली आहे. त्यांनी त्यांना पक्षाच्या मंचावर आपले म्हणणे मांडण्यास सांगितले आहे. तसेच दिल्लीतील पक्ष नेतृत्वानेही यावर विचारमंथन सुरू केले आहे. सचिन पायलट यांचे उपोषण पक्षाच्या हिताच्या विरोधात आहे आणि पक्षविरोधी कृती आहे. त्यांना स्वत:च्या सरकारबाबत काही अडचण असेल. तर मीडिया आणि जनतेच्या ऐवजी पक्षाच्या व्यासपीठावर चर्चा करावी. मी गेल्या पाच महिन्यांपासून प्रभारी आहे; पण पायलट यांनी माझ्याशी या विषयावर कधीही चर्चा केलेली नाही. मी त्यांच्या संपर्कात आहे आणि तरीही त्यांना शांततेने बोलण्याचे आवाहन केले आहे. कारण ते निर्विवादपणे काँग्रेस पक्षाचे भक्कम आधारस्तंभ आहेत.
पायलटच्या उपोषणाबाबत विरोधी पक्षनेते राजेंद्र राठोड म्हणाले की, "राजस्थान सरकारमधील संघर्ष शिगेला पोहोचला आहे. ज्या व्यक्तीने सरकार स्थापनेत सर्वात महत्त्वाची भूमिका बजावली, तीच व्यक्ती आज उपोषणाला बसली आहे आणि मागील सरकारचा पाठिंबा घेत आहे. आपल्या अपमानाबद्दल आणि या सरकारच्या भ्रष्टाचाराबद्दल त्यांच्या मनात वेदना आहेत. काँग्रेस विघटनाकडे वळली आहे. संपूर्ण देशात काँग्रेस कमकुवत झाली आहे."
हेही वाचा