आमची सुईच्या टोकाइतकी जागा कोण घेऊ शकत नाही : अमित शहांचे चीनला चोख प्रत्युत्तर | पुढारी

आमची सुईच्या टोकाइतकी जागा कोण घेऊ शकत नाही : अमित शहांचे चीनला चोख प्रत्युत्तर

पुढारी ऑनलाईन डेस्क : आमची सुईच्या टोकाइतकी देखील जागा कोण घेऊ शकत नाही. आमच्याकडे वाईट नजरेने पाहण्याची देखील कोणामध्ये हिंमत नाही, अशा शब्‍दांमध्‍ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी चीनला खडेबोल सुनावले. अमित शहा (Amit Shah) सध्या अरुणाचल प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. आज (दि. १०) किबिथू येथे ‘व्हायब्रंट व्हिलेज प्रोग्राम’ आणि विविध विकास प्रकल्पांच्‍या शुभारंभप्रसंगती ते बोलत होते.

चीनला गृहमंत्र्यांचे चोख प्रत्युत्तर (Amit Shah)

या वेळी अमित शाह म्हणाले की, संपूर्ण देश आज शांतपणे झोप घेऊ शकतो कारण ITBP चे जवान आणि लष्करी सैन्य हे रात्रं-दिवस सीमेवर कार्यरत आहे. म्हणूनच आज आपण अभिमानाने सांगू शकतो की, भारताकडे वाईट नजरेने पाहण्याची कोणामध्ये हिंमत नाही.

मोदींच्या ‘लुक ईस्ट’ धोरणामुळे ईशान्यचा विकास

2014 पूर्वी संपूर्ण ईशान्य प्रदेश हा अशांत क्षेत्र म्हणून ओळखला जात होता. परंतु पंतप्रधान मोदींच्या गेल्या 9 वर्षांच्या कारकिर्दित ‘लुक ईस्ट’ धोरणामुळे आता ईशान्य भाग हा एक असा प्रदेश म्हणून ओळखला जात आहे जो देशाच्या विकासाला हातभार लावतात, असेही त्‍यांनी नमूद केले.

मला ‘त्या’ सहा अधिकाऱ्यांना श्रद्धांजली वाहायची आहे

२१ ऑक्टोबर १९६२ रोजी तत्कालीन कुमाऊँ रेजिमेंटचे सहा अधिकारी येथे शौर्याने लढले. त्यांच्यामुळे भारताच्या भूमीचे रक्षण होऊ शकले, मला त्यांना श्रद्धांजली वाहायची आहे. १९६३ मध्ये टाईम मॅगझिनमध्ये लिहिले होते की किबिथू येथे झालेल्या युद्धात भारतीय सैन्याकडे शस्त्रे कमी होती, परंतु त्यांचे शौर्य संपूर्ण जगाच्या सैन्यापेक्षा मोठे होते, असेही शहा यांनी सांगितले.

चीनच्या भारताविरोधातील कुरघोड्या थांबत नसल्याचे वारंवार आढळनू येत आहे. नुकतेच काही दिवसांपूर्वी चीनने आपल्या नकाशात अरुणाचल प्रदेशच्या सीमेला लागून असलेल्या ११ ठिकाणांची नावे बदलली. गेल्या पाच वर्षांत चीनने असे तिसऱ्यांदा केले आहे. यापूर्वी २०२१ मध्ये चीनने १५ आणि २०१७ मध्ये ६ ठिकाणांची नावे बदलली होती. चीनने अरुणाचल प्रदेशला भारताचे राज्य म्हणून कधीही मान्यता दिलेली नाही. त्यांनी अरुणाचलची ओळख ‘दक्षिण तिबेट’चा भाग म्हणून केली आहे.

केंद्रीय गृहमंत्र्यांच्या सध्याच्या अरुणाचल प्रदेश भेटीवर देखील चीनने आक्षेप व्यक्त केला आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन जारी केले होते. यामध्ये म्हटले होते की, अमित शहा यांचा दौरा त्यांच्या प्रादेशिक सार्वभौमत्वाचे उल्लंघन आहे. अमित शहा यांच्या अरुणाचल प्रदेश दौऱ्याला आमचा तीव्र विरोध असल्याचे चीनने म्हटले होते.

हेही वाचा

 

Back to top button