पगार मिळाला नाही; तीन मजूरांनी बंगळूरहून ओडिशापर्यंत पायीच कापले अंतर | पुढारी

पगार मिळाला नाही; तीन मजूरांनी बंगळूरहून ओडिशापर्यंत पायीच कापले अंतर

बंगळूर; पुढारी वृत्तसेवा :  ओडिशातील स्थलांतरित कामगारांना पगार न मिळाल्याने बंगळूर ते ओडिशा असे सुमारे एक हजार किमी अंतर चालत जावे लागले. चालतच तीन मजूर कालाहांडीतील आपल्या घरी पोहोचले. तेव्हा त्यांच्या हातात फक्त पाण्याच्या बाटल्या होत्या.

बंगळूरमधील मालकाने पगार न दिल्याने कालाहंडी जिल्ह्यातील टिंगलखान गावातील या तीन मजूरांनी हा प्रवास करण्याचा निर्धार केला. त्यांची माफक बचत संपली होती. त्यांच्याकडे ना अन्न होते ना पैसे. त्यांनी 26 मार्चरोजी प्रवास सुरू केला होता आणि या सात दिवसांत त्यांनी हे अंतर पार केले. ते रात्रीही चालत होते. काही अंतरापुरता त्यांना काही वाहनांनी प्रवाससेवा दिली. एका दुकानदाराने त्यांना जेवन दिले, तर ओडिशा मोटार वाहन संघटनेच्या पोतंगी युनिटच्या अध्यक्षांनी 1500 रूपये दिले. दोन महिन्यांपूर्वी नोकरीच्या शोधात दलालांच्या मदतीने हे मजूर बंगळूरला गेले होते. बंगळूरला गेल्यावर त्यांना काम मिळाले, पण मालकाने दोन महिने काम करूनही पगार दिला नाही. पगार मागितला असता त्यांना मारहाण करण्यात आली, असे या तिघांनी सांगितले.

Back to top button