लंडन, पाकिस्तानातून चालतो ड्रग्जचा कारभार | पुढारी

लंडन, पाकिस्तानातून चालतो ड्रग्जचा कारभार

लंडन/इस्लामाबाद/मुंबई ; वृत्तसंस्था : बॉलीवूडमध्ये ड्रग्जची मुळे खोलवर रुजली आहेत. ड्रग्ज पुरवठादारांसाठी बॉलीवूड हे मोक्याचे मार्केट आहे. वर्षाला कितीतरी कोटींची कमाई या बाजारातून होते. बॉलीवूडमध्ये काही एकाच प्रकारचे ड्रग चालत नाही. अनेक प्रकारच्या नशा आहेत. ड्रग्जसाठी सांकेतिक शब्दही (कोडवर्ड) आहेत. करिना कपूर आणि कॅटरिना कैफ ही नावेही कोडवर्ड म्हणून काही ड्रग्जसाठी वापरली जातात.

बॉलीवूड आणि मुंबईलाच काय, तर अवघ्या देशात ड्रग्जची नशा पसरवण्याच्या आंतरराष्ट्रीय कटातील इक्बाल मिर्ची हे आणखी एक नाव होते. इक्बाल मिर्ची हा 2013 साली लंडन मध्ये मरण पावला. ड्रग्जवरून आता बॉलीवूडचा बादशहा शाहरुख खानचा मुलगा आर्यनचे नाव चर्चेत आले आहे. अर्थात बॉलीवूड असो वा बॉलीवूडमधील कुणी नट; हे सारे फक्त खरेदीदार आहेत. बॉलीवूडमध्ये ड्रग्जचे सेवन प्रतिष्ठेचे प्रतीक मानले जाऊ लागले आहे, हे अधिक चिंताजनक आहे. तणाव कमी करणे, मजा करणे, उत्सुकता अशी अन्य कारणेही त्यामागे आहे.

म्याऊ-म्याऊ सर्वांत लोकप्रिय

नव्वदच्या दशकात मुंबईत डायझॉन, चरस, गांजा, कोकिन, ब्राऊन शुगरची (गर्द) तस्करी होत असे. सध्या ‘एमडी’चे सर्वाधिक सेवन बॉलीवूडमध्ये केले जाते. या नशेलाच म्याऊ-म्याऊ असेही म्हटले जाते. नशा कोकिनसारखाच मिळतो. पण कोकिनच्या तुलनेत फार स्वस्त असणे हेही म्याऊ-म्याऊ जास्त खपण्याचे कारण आहे. एमडी घेतल्यानंतर डोळ्यांची बुब्बुळे मोठी दिसायला लागतात म्हणून याला म्याऊ-म्याऊ म्हटले जाते. एमडी हे एक कीटकनाशक असून त्यावर भारतात कायद्याने बंदी आहे.

हाय प्रोफाईल बॉलीवूड सेलिब्रेटीज कोकिनचा वापर करतात. हा सगळ्यात महागडा नशा आहे. त्याखालोखाल चरस, गांजा, हायड्रोकोडॉन, केटामाईन, एमडीएमए (एक प्रकारचे रसायन), म्याऊ-म्याऊ, मॅनरेक्स वापरले जाते.

मायापुरीतील मायाजाल

बॉलीवूडमध्ये ड्रग्ज पुरवठा कसा होतो, हा जटिल प्रश्न आहे. पुरवठादार आणि पेडलर्स यांचे हे असे मायाजाल आहे, जे सहसा पूर्णपणे उलगडणे कुणालाही जमलेले नाही, जमत नाही आणि जमणार नाही. मग ते पोलीस असोत, की एनसीबी (नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो) काही पेडलर्स पकडले जातात, पण नेटवर्क पुरते उद्ध्वस्त होत नाही. पेडलर्सच पकडले जातात. माल उतरवणारे आणि या धंद्यातील म्होरके कधीही पकडले जात नाहीत.

‘अ’ नावाची व्यक्ती ‘ब’ला ड्रग्ज देते, मग ती (‘ब’) ‘क’ला… अशी सहा लोकांची मालिका असते आणि या मालिकेतील हे सहा लोक परस्परांना ओळखत नाहीत. इतक्या काळजीने ड्रग्जचा पुरवठा केला जातो, असे एका अधिकार्‍याचे यावर म्हणणे आहे. 80 टक्के पुरवठा यंत्रणा ही अंडरग्राऊंड काम करते. एनसीबीच्या हाती कुठल्याही कारवाईत जे काही लागते ते म्हणूनच वरवरचे 20 टक्क्यातील असते!

बॉलीवूडमधील ड्रग्जमाफिया

अभिनेता अर्जुन रामपाल याची चौकशी एनसीबीने केली आहे. अर्जुनचा मोबाईल, लॅपटॉप धुंडाळलेला आहे.

ड्रग्ज आणि कोडवर्ड

एमडी – करिना कपूर
कोकिन – कॅटरिना कैफ, कोला, बोबो, ऑडी, नीना, टॅक्सी, टीनएजर
हायड्रोकोडॉन – बनाना, केळे, विक्स
केटामाईन – ग्रीन, हनी, ऑईल, जेट, व्हिटॅमिन के
मारिजुआना – बटर, व्हॅक्स, 256
मॅस्केलाईन – मीडिया लुना, टोपी, मुन
एमडीएमए – आदम, डिस्को बिस्किट, ब्ल्यू किस
डिप्रेसेंट – गोरिल्ला फ्रॉग, ग्रिन ड्रॅगन
अफू – आंटी, चंदू, चीन
काश्मिरी अफू – काश्मिरी गोळा

कोण आहेत विक्की, टायगर?

* विक्की गोस्वामी अभिनेत्री ममता कुलकर्णी हिचा पती आहे.

* टायगर मेमन हा याकूब मेमन याचा भाऊ आहे. टायगर हा 1993 मधील मुंबई बॉम्बस्फोटांतील गुन्हेगारही आहे.

* विक्की गोस्वामी हे ड्रग्ज तस्करीत आता आंतरराष्ट्रीय स्तरावरील मोठे नाव बनलेले आहे. जगातील प्रत्येक ड्रग त्याच्याकडे येते. स्वत: चव घेऊन तो ड्रगची किंमत ठरवतो.

* विक्कीला भारत, दुबई आणि केनियातही ड्रग्ज तस्करीत अटक झालेली आहे. सध्या तो लंडन मधील एका पॉश एरियात 5.5 दशलक्ष डॉलर किमतीच्या बंगल्यात राहतो.

भारताचा विशाल समुद्रकिनारा

ड्रग्जच्या पुरवठ्याचे दोन मार्ग आहेत. पैकी एक भारताचा समुद्रकिनारा हा सर्वांत मोठा मार्ग आहे. तो इतका विशाल आहे की, पहारा ठेवणे हीच कठीण बाब आहे. माल इकडे तिकडे पाठविण्याची मुंबई, गोवा, दिल्ली आणि पंजाब ही प्रमुख केंद्रे आहेत.

* बॉलीवूडमध्ये ड्रग्ज पुरवठ्यासाठी पेडलर्सचे मायाजाल भेदणे पोलिसांसह ‘एनसीबी’समोरील आव्हान

* ड्रग्जच्या बॉलीवूडमधील बादशहापर्यंत पोहोचण्यात कायद्याचे हातही असमर्थ

* भारतातील ड्रग्जचा व्यापार ब्रिटनमधून विक्की गोस्वामी, कराचीतून टायगर मेमनच्या हातात

Back to top button