पुढारी ऑनलाईन डेस्क : देश बेरोजगारी, कायदा व सुव्यवस्था आणि महागाईचा सामना करत असताना कोणाचीही शैक्षणिक पदवी हा राजकीय मुद्दा असावा का? आज धर्म आणि जातीच्या नावावर लोकांमध्ये मतभेद निर्माण केले जात आहेत. महाराष्ट्रात अवकाळी पावसामुळे पिके नष्ट झाली आहेत. या मुद्द्यांवर चर्चा आवश्यक आहे, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पदवीबाबत विरोधी पक्षांनी घेतलेल्या भूमिकेविरूद्ध पवारांनी पुन्हा एकदा मत मांडल्याने खळबळ उडाली आहे.
हिंडेनबर्ग अहवाल, त्यावर विरोधकांची जेपीसीची मागणी याबाबत शरद पवार यांनी शंका उपस्थित करत विरोधी पक्षांच्या उलट भूमिका मांडल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. त्यानंतर पुन्हा एकदा पवार यांनी विरोधकांकडून सत्ताधारी नेत्यांच्या पदवीबाबत प्रश्न उपस्थित केले जात असल्यावर टीका केली आहे. पंतप्रधानांच्या पदवीच्या वादावर बोलताना हा मुद्दा नसून नेते त्यावर आपला वेळ वाया घालवत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
ते म्हणाले, आज महाविद्यालयीन पदवीचा प्रश्न पुन्हा पुन्हा विचारला जात आहे, तुमच्याकडे कोणती पदवी आहे, माझ्याकडे कोणती पदवी आहे. पण हा राजकीय मुद्दा आहे का? बेरोजगारी, कायदा आणि सुव्यवस्था, महागाई किंवा अन्य महत्त्वाच्या प्रश्नांवर केंद्र सरकारला घेरले पाहिजे. धर्म आणि जातीच्या आधारावर लोकांमध्ये दुरावा निर्माण केला जात आहे. महाराष्ट्रात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची पिके नष्ट केली आहेत. अशा विषयांवर चर्चा करायला हवी, असे मत पवार यांनी मांडले आहे.
शरद पवार यांनी दुसऱ्यांदा विरोधकांच्या भूमिकेपेक्षा वेगळी भूमिका घेतली आहे. विरोधक गौतम अदानी प्रकरणाच्या चौकशीसाठी जेपीसी स्थापन करण्याची मागणी करत असताना प्रथम त्यांनी जेपीसीची मागणी फेटाळून लावली होती. आता पदवीच्या वादावरही त्यांनी विरोधी ऐक्यापासून वेगळे मत मांडले आहे. पंतप्रधानांच्या पदवीबाबत आम आदमी पक्ष आणि ठाकरे गटाकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. देशाचा पंतप्रधान सुशिक्षित असावा, असे आम आदमी पक्षाचे म्हणणे आहे. केजरीवाल यांनी गुजरात हायकोर्टात जाऊन पंतप्रधानांच्या पदवीची मागणी केली होती. त्यासाठी त्यांना २५ हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला होता. उद्धव ठाकरे यांनीही पंतप्रधानांच्या पदवीचा मुद्दा उपस्थित केला आहे.
हेही वाचा :