चंदा कोचर, धूत यांच्याविरुद्ध सीबीआयचे आरोपपत्र | पुढारी

चंदा कोचर, धूत यांच्याविरुद्ध सीबीआयचे आरोपपत्र

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) आयसीआयसीआय-व्हिडिओकॉन कर्ज प्रकरणी आयसीआयसीआय बँकेच्या माजी एम.डी. व अध्यक्ष चंदा कोचर, त्यांचे पती दीपक कोचर आणि व्हिडिओकॉन समूहाचे अध्यक्ष वेणुगोपाल धूत यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे.

न्यायालयाने या प्रकरणाची अद्याप दखल घेतलेली नाही. व्हिडिओकॉन इंटरनॅशनल इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, व्हिडिओकॉन इंडस्ट्रीज लिमिटेड, वेणुगोपाल नंदलाल धूत, चंदा कोचर, दीपक वीरेंद्र कोचर, न्यूपॉवर रिन्युएबल्स लिमिटेड, सुप्रीम एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड आणि अज्ञात लोकसेवक यांच्याविरुद्ध आयपीसीतील कलम 102-02 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

चंदा कोचर यांच्या अध्यक्षतेखालील आयसीआयसीआय बँकेतील मंजुरी समितीने 26 ऑगस्ट 2009 रोजी व्हिडिओकॉन इंटरनॅशनल इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडला 300 कोटी रुपयांचे मुदत कर्ज मंजूर केले होते. ही मंजुरी देताना चंदा कोचर यांनी सार्वजनिक सेवक म्हणून आपल्या अधिकृत पदाचा गैरवापर केला, असे सीबीआयचे म्हणणे आहे.

Back to top button