तालिबान चे ‘मिशन इंडिया’ सुरू! | पुढारी

तालिबान चे ‘मिशन इंडिया’ सुरू!

काबुल/श्रीनगर ; वृत्तसंस्था : तालिबानचे ‘मिशन इंडिया’ सुरू झालेले आहे. काश्मीरमधील विघटनवाद्यांना सक्रिय पाठबळ पुरविण्याची तयारी तालिबान ने चालविली असून, गोपनिय कागदपत्रांतून या दहशतवादी संघटनेची कार्यक्रम पत्रिकाच समोर आलेली आहे. तालिबानने काश्मीरबाबत भारताला अप्रत्यक्ष धमकी देऊन, काबुलमधील गुरुद्वार्‍यात हैदोस घालून तसेच भारतातील सोमनाथ मंदिराचा विध्वंस करणारा मोहम्मद गझनी याच्या कबरीला तालिबानी नेत्यांनी भेट देऊन भारताविरुद्ध बिगूल फुंकला आहे.

मोहम्मद गझनी याने सोमनाथ मंदिराचा विध्वंस करणे, ही एक आदर्श ऐतिहासिक घटना होती. गझनी हा महान इस्लामिक योद्धा होता, असा गझनीचा जाहीर गौरव तालिबानी नेत्यांनी ट्विटरवरून करून आपले नजीकच्या काळातील इरादेच बोलून दाखविले आहेत.

अफगाणिस्तानमध्ये तालिबानने सत्ता काबीज केल्यानंतर लगोलग काश्मीरबद्दल केलेले संदिग्ध वक्तव्य तसेच सध्या काश्मीरमधील अत्यल्पसंख्याक हिंदू आणि शिखांचे इस्लामिक कट्टरवाद्यांनी सुरू केलेले हत्यासत्र, या दोन्ही बाबींची, गुप्तवार्ता विभागाकडून परस्परांशी सांगड घालून पाहिली जात आहे. एका गोपनिय अहवालानुसार तर तालिबानचे मिशन इंडिया कधीच म्हणजे अफगाणिस्तानातील सत्ता बळकावण्यापूर्वीच सुरू झालेले आहे. अफगाणिस्तानातील सत्ता काहीशी स्थिरस्थावर होताच तालिबानने आपल्या या मिशनचा दुसरा अध्याय सुरू केलेला असल्याचे सांगण्यात येते.

काश्मीरमध्ये 1990 च्या दशकात हिंदूंविरुद्ध हिंसाचार झाला आणि त्यांना आपली भूमी सोडण्यास भाग पाडण्यात आले. काश्मीरमधून परागंदा झालेल्या या हिंदूंचे काश्मीरमध्येच पुनर्वसन करण्याच्या केंद्र सरकारच्या धोरणाअंतर्गत हिंदूंच्या बळकावण्यात आलेल्या मालमत्ता शोधून त्या हिंदूंना पूर्ववत देण्यास सुरुवात झाली. काश्मिरी हिंदूंना काश्मीरमध्ये नोकर्‍या उपलब्ध करून देण्याचे धोरण सुरू झाले. यानंतर बराच काळ शांततेत गेला, पण अफगाणिस्तानमध्ये तालिबानचे कथित विशुद्ध इस्लामी सरकार स्थापन झाले आणि काश्मीरच्या कट्टरवाद्यांना स्फुरण चढले.

केंद्र सरकारच्या काश्मीरमधील अल्पसंख्याक पुनर्वसनाच्या धोरणामुळे तसेच काश्मीर हा प्रांत उर्वरित भारतासाठीही खुला केल्यामुळे येथे बिहार, उत्तर प्रदेशातून हिंदू समाजातील मजूर, पाणीपुरी, भेळपुरीवाले येऊ लागले. इतका हिंसाचार करून ज्या हिंदूंना 90 च्या दशकात आपण काश्मीरमधून हाकलून लावले ते परत येत आहेत म्हटल्यावर तालिबानी विचारसरणीच्या कट्टरवाद्यांनी हिंदूंविरुद्ध हिंसाचार पूर्ववत सुरू केला.

श्रीनगरातील मेडिकल स्टोअरचालक कट्टरवाद्यांच्या हिटलिस्टवर होतेच. कारण मक्खनलाल यांनी हिंदूंविरुद्ध 90 च्या दशकात इतका हिंसाचार होऊनही काश्मीर सोडले नव्हते. हा हिंदू माणुस भीत नाही ना, मग यालाच आधी मारले पाहिजे म्हणून या कट्टरवाद्यांनी मक्खनलाल यांची त्यांच्या दुकानात शिरून गोेळ्या घालून हत्या केली.

सीमेवरील कडक पहार्‍यामुळे आता एके 47 वगैरे उपलब्ध होणे दहशतवाद्यांना अवघड बनले आहे. पूर्वी दहशतवादी लष्करी जवानांना आपले लक्ष्य करत असत, पण लष्कराची येथील ताकद वाढल्याने तेही अशक्य बनले आहे. भारतीय लष्कराने काश्मीरमधील दहशतवादी संघटनांचे कंबरडे मोडलेले आहे. दहशतवाद्यांकडे उपलब्ध असलेला एके 47 चा संपूर्ण साठा लष्कराने संपविला आहे. ‘जिहाद’ तर सुरूच ठेवला पाहिजे म्हणून कट्टरवादी, विघटनवादी तालिबानी विचारसरणी आता हिंदू आणि शीख सामान्य नागरिकांना ठार करू लागली आहे. त्यासाठी पिस्तुले आदी छोटी हत्यारे वापरली जात आहेत.

दोघे दहशतवादी परवा जेव्हा एका शाळेत शिरले तेव्हा या शाळेतील मुख्याध्यापिका शीख महिला आहे आणि एक हिंदू शिक्षकही या शाळेत आहे, ही माहिती दहशतवाद्यांना आधीपासून होती. शाळेत शिरल्यानंतर त्यांनी सर्व शिक्षकांची ओळखपत्रे तपासली. ओळखपत्रांवरील सतिंदर कौर आणि दीपक चंद ही नावे वाचून, तपासून या दोघांना मुस्लिम शिक्षकांतून वेगळे केले आणि अत्यंत जवळून या दोघांवर पिस्तुले झाडली.

नंतर लगेच बिहारमधून आलेल्या व श्रीनगरात पाणीपुरी विकणार्‍या पासवान नावाच्या हिंदूची हिंदू असूनही काश्मीरमध्ये आलाच कसा या एकमेव कारणाने हत्या करण्यात आली. तालिबानी इस्लामिक कट्टरवादाचे हे लोण काश्मीरमध्ये वेगात पसरले आहे. तालिबानची काश्मीरवर नजर आहेच. काश्मीरमध्ये भारताकडून मुस्लिमांवर अन्याय होत असल्याचे मागेच तालिबानच्या प्रवक्त्याने जरतरच्या भाषेत का असेना, पण जाहीरपणे म्हटलेले आहे.

तालिबानने अफगाणिस्तनातील अल्पसंख्याक समुदायांना संरक्षण व सन्मान देण्यात येईल, असा शब्द जगाला दिलेला असला तरी त्याआधी याच तालिबान्यांनी एका गुरुद्वार्‍यात 36 शिखांची निर्घृण हत्या केली होती, हे विसरता येणार नाही. सत्तेत आल्यानंतरही काबुलच्या गुरुद्वार्‍यात शिरून तालिबान्यांनी तेथे आश्रयाला असलेल्या शिखांना व हिंदूंना शिविगाळ केली. सीसीटीव्ही कॅमेर्‍याची मोडतोड केली, ही घटना अगदी परवापरवाचीच आहे.

काश्मीरबाबत तालिबानने केलेले वक्तव्य तसेच काबुलमधील गुरुद्वार्‍यात घातलेला हैदोस हे तालिबानच्या मिशन इंडियाचे पूर्वसंकेत आहेत. अफगाणिस्तानात लश्कर-ए-तय्यबा आणि जैश-ए-मोहम्मदसारख्या भारतविरोधी दहशतवादी संघटनांना आधी पाकिस्तान हे एकमेव आश्रयस्थळ होते. तालिबानच्या राजवटीत त्यांना अफगाणिस्तानचे कुरणही आयतेच मिळाले आहे.

तालिबानचे सरकार स्थापन करण्यात, तालिबानविरोधकांना युद्धात हरविण्यात पाकिस्तान व पाकिस्तानी लष्कराने थेट भूमिका बजावली आहे. त्यामुळे गेल्या दोन दशकांपासून अफगाणिस्तानात भारताने केलेले मदतकार्य, गुंतवणूक पाण्यात गेले आहे. विकासाच्या तसेच पायाभूत सुविधांच्या अनेक योजना भारताने अफगाणिस्तानात राबविल्या.

जवळपास 3 अब्ज अमेरिकन डॉलर त्यासाठी खर्ची घातले आहेत. ते सारेच नव्या परिस्थितीत व्यर्थ ठरले आहे. तालिबानविरुद्ध रेझिस्टन्स फोर्स लढत असताना तालिबानला पाकिस्तानने थेट लष्करी मदत केली होती, तेव्हा भारताने अशीच मदत रेझिस्टन्स फोर्सला केली तर भारताला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असे तालिबानचा प्रवक्ता सुहैल शाहीन उघड उघड बोलला होता.

अमेरिकेने अफगाणिस्तानातून सैन्य काढून घेण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर अगदी सुरुवातीला दोहा येथे तालिबानच्या काही नेत्यांशी भारतीय राजनयिकांनी चर्चा केली होती, पण पाकिस्तान आणि तालिबानची घनिष्ट युती पाहाता नंतर कुठल्याही पातळीवर भारताने याबाबत पुढाकार घेतला नाही. पुढे तालिबान सरकारला मान्यता तर दिलीच नाही. उलट जागतिक व्यासपीठांवरून भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तालिबानसारख्या नकारात्मक शक्तींविरोधात अवघ्या जगाने एकवटले पाहिजे, असे खुले आवाहन केले. यामुळे तालिबान बिथरलेला आहे.

काश्मीरमधील विघटनवाद्यांसाठी रसद व आपली जमीन उपलब्ध करून देण्याचे काम पाकिस्तान सातत्याने करत आलेला आहे. आता भारताचा पारंपरिक मित्र असलेल्या अफगाणिस्तान या देशाची सत्ताच तालिबान या भारत विरोधी दहशतवाद्यांनी बळकावलेली असल्याने तो भारताच्या दृष्टीने मित्र देशांच्या यादीत राहिलेला नाही.

अर्थात सध्याच्या परिस्थितीत तालिबानशी ‘न्यूट्रल’ (मैत्री नाही, की शत्रुत्व नाही) संबंधही ठेवण्याच्या स्थितीत भारत राहिलेला नाही. कारण इस्लामिक कट्टरवाद हा तालिबानचा गाभा आहे. तालिबानची एकूण बैठक त्यावर आहे. भारत हा गेल्या अनेक वर्षांपासून या कट्टरवादाच्या यातना सोसतो आहे.

चीन व पाकिस्तान या भारताच्या दोन्ही वैर्‍यांनी तालिबानला उघड पाठिंबा दिलेला आहे. भारताने दिलेला नाही आणि अफगाणिस्तानातील सद्यस्थिती पाहाता भारत नजीकच्या काळात तालिबान सरकारला मान्यता देईल, अशी कुठलीही चिन्हे नाहीत. भारताने तालिबानला मान्यता दिली तरी मैत्रीला जागतील, अशी कुठलीही लक्षणे तालिबानमध्ये नाहीत.

आता तालिबानने आपला मोर्चा भारताकडे विशेषत: काश्मीरकडे वळविण्याचे ठरवून टाकलेले असल्याने आता भारतासमोर दुहेरी आव्हान उभे ठाकणार आहे. पंतप्रधानांनी जागतिक व्यासपीठांवरूनच थेट तालिबानी विचारसरणीला विरोध दर्शविलेला आहे, तो या दुहेरी आव्हानांचा सामना करण्याची तयारी ठेवूनच!

इतिहास शत्रुत्वाचाच

1999 मध्ये आयसी-814 विमानाचे अपहरण दहशतवाद्यांनी केले होते. प्रवाशांचे जीव वाचावेत म्हणून जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या कुख्यात दहशतवादी मौलाना मसूद अझर, अहमद जरगर आणि शेख अहमद उमर सईद यांची कैदेतून सुटका करण्याची वेळ भारतावर तालिबानमुळेच ओढविली होती.

Back to top button