परंपरा : जागर शक्तिपीठांचा! | पुढारी

परंपरा : जागर शक्तिपीठांचा!

प्रा. डॉ. प्रकाश खांडगे

संपूर्ण भारतात शक्तिदेवतांची विविध तीर्थक्षेत्रे असून, शारदीय आणि वासंतिक नवरात्रौत्सवात सर्जनाची शक्ती असणार्‍या देवतेची पूजा बांधली जाते ती घटस्थापनेच्या रूपाने! घटस्थापना म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू , आकाश या पंचमहाभूतांची प्रतीकात्मक पूजा. नवरात्र म्हणजे सर्जनाचा उत्सव!

शारदीय नवरात्रात आणि वासंतिक नवरात्रात भारतातील विविध शक्तिपीठांच्या ठायी शक्तिदेवतेचे संकीर्तन सुरू असते. वेगवेगळ्या रूपांतील शक्तिदेवतांच्या पुराणकथा भारतीय संस्कृतीत लोकमानसाच्या मुखी असतात. विश्वाची जननी असलेल्या या शक्तिदेवतांची दैत्यमर्दिनी, मंगलकारिणी, सर्जनधारी अशी अनेक रूपे आहेत. संपूर्ण भारतात 51 शक्तिपीठे आहेत, त्यातील 18 मुख्य शक्तिपीठे आहेत. शक्तिपीठांची निर्मिती कशी झाली यासंदर्भात अनेक पुराणकथा आणि दंतकथाही उपलब्ध आहेत. देवी सतीचे शिर भगवान विष्णूने सुदर्शनचक्राने उडविले. सतीच्या शरीराचे 51 तुकडे विविध ठिकाणी विखुरले गेले. भगवान शंकर दुःखी होऊन सतीचा शोक करीत हिंडत राहिले, अशी एक कथा आहे. अशा अनेक कथांची गुंफण पुराणांमध्ये, लोककथांमध्ये, विधिकथांमध्ये केलेली आढळते.

महाराष्ट्रात साडेतीन शक्तिपीठांचे देवीमंडल आहे. कोल्हापूरची श्री महालक्ष्मी अर्थात अंबाबाई, माहूरची श्री रेणुका, तुळजापूरची भवानी ही तीन पूर्ण पीठे आणि वणीची सप्तशृंगी हे अर्धे पीठ म्हणून ओळखले जाते.

करवीरनिवासिनी श्री महालक्ष्मी दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणार्‍या कोल्हापूरला स्थानापन्न झालेली आहे. पूर्ण भारतवर्षात करवीरनिवासिनी श्रद्धेय आहे. महालक्ष्मीच्या भक्तीची परंपरा हजार-बाराशे वर्षांपासूनची आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांना जोडणारा देवताविषयक श्रद्धाअनुबंध कानडा मल्हारी आणि कानडा विठ्ठल यांच्या रूपाने सुस्थापित होता. त्यात महालक्ष्मीच्या रूपाने आदिमायेच्या भावबंधाची भर पडली.

‘करवीर माहात्म्यम्’ हे स्थलपुराण प्रसिद्ध आहे. ‘वाराणस्याधिकं क्षेत्रं करवीरं पुरं महत्’ असा करवीरनगरीचा उल्लेख या माहात्म्यात केला आहे. वाराणसीपेक्षाही करवीरनगरी श्रेष्ठ आहे, असे म्हणतात. कारण, तेथे श्री महालक्ष्मीचे वास्तव्य आहे. डॉ. दिनेशचंद्र सरकार यांनी ‘दि शाक्त पीठाज्’ या ग्रंथातून देवीस्थानांच्या सांस्कृतिक इतिहासात मोलाची भर घातली असल्याचे मत देवता-वैज्ञानिक इतिहास आणि सांस्कृतिक इतिहासाचे साक्षेपी संशोधक डॉ. रामचंद्र चिंतामण ढेरे यांनी आपल्या ‘करवीरनिवासिनी श्री महालक्ष्मी’ या ग्रंथात व्यक्त केले आहे. ‘श्री करवीर माहात्म्यम्’मध्ये कपालेश्वराचे माहात्म्यही समाविष्ट आहे. आळंदी म्हणजे अलंकापूर जसे शिवपीठ म्हणून ओळखले जाते तसेच करवीर क्षेत्र कपालेश्वर तीर्थ ओळखले जायचे.

प्रसिद्ध संशोधक ग. ह. खरे यांनी श्री महालक्ष्मीशी संबंधित कथा सांगितली आहे ती अशी –

‘गोदातीरावरील पैठणनगरीत सातवाहन राजा राज्य करीत असताना राजाने शूद्रक नामक एका बलशाली पुरुषाच्या शरीरबलावर मुग्ध होऊन त्याला पैठणनगरीचा नगररक्षक (कोतवाल) बनविले. शूद्रकाची ही वाढती प्रतिष्ठा सहन न झाल्याने मत्सरी जनांनी सातवाहन राणीलाच भूल पाडून पळविली आणि शूद्रकाने अपहरण केले आहे, असे राजाला पटविले. राजाने या आरोपावर विश्वास ठेवून शूद्रकाला सुळावर चढविण्याचा निर्णय केला. शूद्रकाने राणीच्या शोधार्थ राजाकडून थोड्या दिवसांची मुदत मागून घेतली. तो आपल्या प्रशिक्षित श्वानांच्या सहाय्याने शोध घेत घेत ‘श्री कोल्हापूर’ या क्षेत्रातील श्री महालक्ष्मी मंदिरात आला. तेथे त्याने देवीला प्रसन्न केले आणि तिच्या कृपाबळावर कोल्हासुर आणि मायासुर या असुरांवर विजय मिळवून राणीला मुक्त केले. कोल्हापुरातील श्री महालक्ष्मीच्या कृपेने प्राप्त झालेल्या या यशाचे प्रतीक म्हणून पैठणनगरीत शूद्रकाने श्री महालक्ष्मीचे ठाणे उभे केले.

मरिआई आणि लक्ष्मीआई ही राज्यातील अनेक पोतराज या लोकसंस्कृतीच्या उपासकांची आराध्य दैवते आहेत. त्र्यंबोली, टेंबलाई ही श्री महालक्ष्मीचीच रूपे असल्याची लोकमानसाची श्रद्धा आहे. श्री महालक्ष्मी, श्री रेणुकामाता, श्री भवानीमाता आणि श्री सप्तशृंगीमाता यांच्या दोन पातळ्यांचे श्रद्धाविश्व आढळते. एक या देवतांचे अभिजनांनी केलेले उन्नयन, त्यासाठी रचलेली संस्कृत माहात्म्ये, कवने, श्लोक आणि लोकमानसातील भुत्ये, आराधी, भोपे, गोंधळी आदी लोकपुरोहितांनी घडविलेले या देवतांचे लोकजागरण. कोल्हापूरची श्री महालक्ष्मी अंबाबाईच्या रूपात गोंधळ्यांचा संकीर्तन विषय ठरली. त्यांच्या पदांमध्ये तसे ठायी ठायी उल्लेख आहेत ते असे –

आई गं अंबाबाई हाकेला माझ्या धाव
भरलाय तुझा मांड, आई गोंधळाला यावं
तूच अंबिका, तूच चंडिका
तूच कालिका, तूच रेणुका
आदिमाया शक्ती रूप तुझं दावं
भरलाय तुझा मांड आई गोंधळाला यावं

श्री अंबाबाईची नित्योपासना पहाटे घंटानादाने सुरू होते. घंटानाद आणि काकड आरतीने मंदिर परिसर निनादून निघतो. गर्भगृहाचे दरवाजे उधळत समयांची प्रभा फाकते, भाविक जणू नेत्रांचे दिवे करून देवी श्री महालक्ष्मीची पूजा बांधतात. भूपाळ्या, अभंगांनी वातावरण अधिकच मंगलमय होते. तैलमार्जन, उष्णोदक स्नान, विधिवत पूजा सकाळी साडेआठच्या सुमारास सुरू होते. दुपारी अलंकार पूजा होते. रात्री आठ वाजता पंचोपचार पूजा होते. डॉ. रामचंद्र चिंतामण ढेरे यांनी करवीरनिवासिनी श्री महालक्ष्मी या ग्रंथात नित्योपासनेचे वर्णन केले आहे. नवरात्रौत्सव, दसरा महोत्सव, किरणोत्सव असे उत्सव म्हणजे श्री महालक्ष्मीच्या भक्तांसाठी जणू ‘आनंदाचे डोही आनंद तरंग.’ शिलाहार, चालुक्य आदी राजघराण्यांशी कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मी परंपरेचा थेट संबंध अनेक संशोधकांनी जोडला आहे.

कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मीसारखीच तुळजापूरची भवानी हे पूर्ण पीठ म्हणून मान्यता पावलेले आहे. स्कंद पुराणातील सह्याद्री प्रकरणात या देवतेसंबंधी कथा आहे. कर्दभ ऋषींची पत्नी अनुभूती ध्यानाला बसली होती तेव्हा कुकर नावाच्या राक्षसाने तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

अनुभूतीच्या विनंतीनुसार देवी भगवती डोंगरावर स्थानापन्न झाली. तिला तुर्जा म्हणजेच पुढे तुळजा असे नामनिधान प्राप्त झाले. तुळजापूरच्या मंदिरात नवरात्रात होमाच्या वेळी पशुबळी प्रथा रूढ आहे. ही प्रथा भगवती देवीने केलेल्या राक्षसवधाचे प्रतीक म्हणून पाळण्यात येते. छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेची प्रेरणा तुळजाभवानीच्या कृपाशीर्वादाने प्राप्त झाली. तुळजापूरच्या भवानीमातेचे उपासक कदमराई गोंधळी आहेत. देवीच्या मंदिरात आजही राजाभाऊ गोंधळी हे पारंपरिक गोंधळ सादर करून देवीची सेवा करतात. पूर्वी गोंधळी आणि आराध्यांना भवानीमातेच्या मंदिराची वतने होती.

तुळजापूरच्या भवानीसारखेच माहूरची रेणुका हे पूर्ण पीठ आहे. विदर्भ आणि मराठवाड्याच्या सीमेवरील माहूर हे भारतभरच्या देवी भक्तांचे श्रद्धास्थान आहे. किनवटच्या महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. मार्तंड कुलकर्णी हे स्वतः रेणुकाचे उपासक असून, त्यांनी रेणुकावर संशोधनपर लेखन केले आहे. माहूर पूर्वी आंध्र प्रदेशातील आदिलबाद जिल्ह्यात होते त्यानंतर भाषावार प्रांतरचनेनुसार ते नांदेड जिल्ह्यात आले. माहूर तीर्थक्षेत्राचा उल्लेख सत्ययुगात आमलीग्राम, त्रेतायुगात सिद्धपूर, द्वापरयुगात देवनगर आणि कलियुगात मातापूर असा करण्यात आला आहे. दत्त संप्रदाय, महानुभाव, वारकरी संप्रदाय, शाक्त संप्रदाय, सुफी संप्रदाय, नाथ संप्रदाय अशा विविध संप्रदायांचे देवीतीर्थ म्हणून माहूर ओळखले जाते. या स्थळी विविध संप्रदाय आणि अध्यात्म प्रणालींचा सुरेख संगम होताना दिसतो. पैनगंगेच्या तिन्ही बाजूंच्या प्रवाहात सह्याद्रीच्या पर्वतराजीत माहूर पहुडले आहे. ‘मा’ म्हणजे आई आणि कन्नड भाषेत ‘हूर’ म्हणजे गाव असे हे ‘आईचे गाव’! जगतजननी रेणुकाचे हे मूळ पीठ, प्रभू दत्तात्रयांचे निद्रास्थान म्हणूनही ओळखले जाते. माता अनुसयाचे स्थळ, महानुभाव पंथीयांचे पवित्र स्थळ, देवदेवेश्वर, संत विष्णुदासांची कर्मभूमी, थोर सुफी संत सोनपीर यांच्या दर्ग्याने पावन झालेली ही भूमी, राजे उद्देराम यांच्या घराण्याचा भव्य वाडा अशा अनेक गुणवैशिष्ट्यांनी माहूर प्रसिद्ध आहे. माहूरला शारदीय नवरात्रौत्सव, वासंतिक नवरात्रौत्सव, दत्त जयंतीचा सोहळा प्रतिवर्षी होतो. गोंधळ्यांच्या विधिगीतांसोबत कीर्तन सप्ताहाची फार मोठी परंपरा माहूरला आहे. येथे दत्त स्थानापासून मैनवर सती अनुसयेचे स्थान आहे. संत विष्णुदासांनी या क्षेत्राचे माहात्म्य वर्णिले आहे ते असे –

नित्ययातृतिर्थी स्नान । नित्य रेणुका दर्शन ।
आदिमाये तुजपाशी । सर्व देव तीर्थ काशी ।
मातृतिर्थ रहिवास । हेची वैकुंठ कैलास ।

शक्तिदेवतेच्या तीन पूर्ण पीठांसोबत अर्धे पीठ म्हणून नाशिक जिल्ह्यातील वणीची सप्तशृंगी ओळखली जाते. नाशिकपासून 65 कि.मी. अंतरावरील 4,800 फूट उंचीवरील सप्तशृंग गडावर देवीचे ठाणे आहे. सह्याद्रीच्या पर्वतराजीतील सात शितूवरांचा प्रदेश म्हणजे सप्तशृंग!
महिषासुरमर्दिनी म्हणून सप्तशृंगी देवी ओळखली जाते की, जी देवांच्या संरक्षणासाठी होमातून प्रगट झाली आणि तिने महिषासुराचे मर्दन केले. हिला ब्रह्मरूपिणी असेही म्हणतात. ब्रह्मदेवाच्या कमंडलूतून निघालेल्या गिरीजेचे रूप म्हणजे सप्तशृंगी.

संपूर्ण भारतात शक्तिदेवतांची विविध तीर्थक्षेत्रे असून, शारदीय आणि वासंतिक नवरात्रौत्सवात सर्जनाची शक्ती असणार्‍या देवतेची पूजा बांधली जाते ती घटस्थापनेच्या रूपाने! घटस्थापना म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या पंचमहाभूतांची प्रतीकात्मक पूजा. नवरात्र म्हणजे सर्जनाचा उत्सव! हा सर्जनाचा उत्सव साडेतीन शक्तिपीठांच्या ठायी नव्हे, तर अगदी पाकिस्तान, नेपाळ, बांगला देश या देशांमधील शक्तिपीठांच्या ठिकाणीही सुरू असतो – पंचप्राण दिवट्या अन् दोन्ही नेत्रांच्या हिल्लाळांसह !

Back to top button