
पुढारी ऑनलाईन डेस्क : सुरक्षेच्या कारणांमुळे लोक आपल्या कष्टाचे पैसे बँकांमध्ये जमा करतात. बँकांच्या माध्यमातून आपले आर्थिक व्यवहार सुरळीतपणे चालू राहतात असा ठाम विश्वास खातेदाराला असतो. पण सध्या एक माहिती समोर आली आहे. ज्यामध्ये असे अनेक खातेदार आहेत ज्यांनी बँकेत पैसे भरले पण ते बँक व्यवहारांपासून लांबच राहिले आहेत. पैसे भरून देखील ते हे विसरुन गेले आहेत की आपले पैसे बँकेत आहेत. गेल्या 10 वर्षांपासून या खातेदारांनी बँकेत आपल्या जमा रक्कमेबाबत कोणतीच विचारपूस अथवा कोणतीच माहिती घेण्याचा प्रयत्नही केलेला नाही. अशा खातेदारांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी रिझर्व्ह बँकेकडे 35000 कोटी रुपयांची रक्कम जमा केली आहे, ज्याला कोणीच दावेदार नाही. (Unclaimed Amount)
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांकडे 10.24 कोटी खाती अशी आहेत ज्यामध्ये फेब्रुवारी 2023 पर्यंत एकूण 35,012 कोटी रुपये जमा आहेत. हे खातेधारक गेल्या 10 वर्षांपासून बँकेमध्ये आपले पैसे असल्याचे विसरून गेले आहेत. त्यामुळे या खात्यांमधील रक्कमेला दावेदार नाही. या दावा न केलेल्या ठेवी सार्वजनिक बँकांनी रिझर्व्ह बँकेकडे (RBI) हस्तांतरित केल्या आहेत. (Unclaimed Amount)
दावा न केलेली ठेव ही अशी रक्कम आहे जी 10 वर्षांपेक्षा जास्त काळ चालविली जात नाही. मार्च 2022 पर्यंत बँकांमध्ये 48,262 कोटी रुपये दावा न केलेल्या ठेवींच्या स्वरूपात होते. वित्त राज्यमंत्री भागवत कराड यांनी लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.
भारतीय रिझर्व्ह बँक डिपॉझिटर्स एज्युकेशन अँड अवेअरनेस फंड (DEAF) मध्ये दावा न केलेल्या ठेवी ठेवल्या जातात. फेब्रुवारी 2023 पर्यंत, स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) कडे 8,086 कोटी रुपये, पंजाब नॅशनल बँकेकडे 5,340 कोटी रुपये, कॅनरा बँक 4,558 कोटी रुपये आणि बँक ऑफ बडोदाकडे 3,904 कोटी रुपये हक्क नसलेल्या ठेवी होत्या. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) नुसार, जर एखाद्या ग्राहकाने त्याच्या खात्यातून 10 वर्षांपर्यंत कोणताही व्यवहार केला नाही, तर त्या खात्यात जमा केलेली रक्कम क्लेम नाही. ज्या खात्यातून व्यवहार होत नाहीत ते खाते निष्क्रिय केले जाते (डॉर्मंट खाते).
हेही वाचा