

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्यानंतर त्यांना सरकारी बंगला रिकामा करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर, दिल्लीची रहिवासी असलेल्या राजकुमारी गुप्ता यांनी मंगोलपुरी येथील त्यांचे 4 मजली घर राहुल गांधींच्या नावे करून त्यांना अनोखी भेट दिली आहे. खासदारकी रद्द केल्यानंतर राहुल यांना 22 एप्रिलपर्यंत 12 तुघलक लेन येथील त्यांचे अधिकृत निवासस्थान रिकामे करावे लागणार आहे. 27 मार्च रोजी लोकसभेच्या गृहनिर्माण समितीने त्यांना यासंदर्भात नोटीस पाठवून 22 एप्रिलपर्यंत त्यांचे अधिकृत निवासस्थान रिकामे करण्यास सांगितले होते.
राजकुमारी गुप्ता दिल्ली काँग्रेस सेवा दलाच्या कार्यकर्त्या असून, दिल्लीतील मंगोलपुरी येथे त्यांचे स्वतःचे चार मजली घर आहे. राहुल यांना सरकारी निवासस्थान रिकामे करण्यास फर्माविण्यात आल्यामुळे आपण स्वतःचे घर त्यांच्या नावे केल्याचे गुप्ता यांनी म्हटले आहे. याची कागदपत्रेही त्यांनी माध्यमांसमोर सादर केली आहेत.
दरम्यान, काँग्रेसने 'माझे घर, राहुलचे घर' या मोहिमेला सुरुवात केली आहे. त्याचा आरंभ मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी केला. यानंतर अन्य काँग्रेस नेत्यांनी ही मोहीम सुरू केली. भोपाळमध्ये काँग्रेस नेत्यांनी घराबाहेरील नावाच्या पाट्या बदलण्यास सुरुवात केली. त्यावर 'माझे घर, राहुलचे घर' असे लिहिले आहे. नोटीसनंतर काँग्रेस नेते मध्य प्रदेशात प्रचार करत आहेत. प्रचाराचा एक भाग म्हणून काँग्रेस नेते आपल्या घरावर 'मेरा घर, राहुल गांधी का घर'चे बॅनर, पोस्टर लावत आहेत. भोपाळमध्ये काँग्रेस नेते रवींद्र साहू झुमरवाला यांनी त्यांच्या घराच्या नावाची पाटी बदलून राहुल गांधींच्या नावाची पाटी लावली. घराची ऑफर देताना राहुल हे पाहिजे तेव्हा येथे येऊ शकतात आणि राहू शकतात, असेही त्यांनी सांगितले.
हरिद्वार; वृत्तसंस्था : भारत जोडो यात्रेदरम्यान भाषणात संघाची 21 व्या शतकातील कौरव अशी संभावना केल्याबद्दल हरिद्वारच्या न्यायालयात काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात मानहानीचा दावा दाखल करण्यात आला आहे. संघ स्वयंसेवक कमल भदोरिया यांनी दिलेल्या तक्रारीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी न्यायालयात 12 एप्रिल रोजी सुनावणी होईल, असे कमल भदोरिया यांचे वकील अरुण भदोरिया यांनी सांगितले.