

नवी दिल्ली : सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी महिन्याच्या सुरुवातीलाच व्यावसायिक वापराच्या गॅस सिलिंडर दरात 91.50 रुपयांची कपात केली आहे. 19 किलो वजनाच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दर त्यामुळे 2 हजार 28 रुपयांपर्यंत कमी झाले आहेत. दरम्यान, तेल कंपन्यांनी घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरचे दर मात्र 'जैसे थे' ठेवले आहेत.
याआधी 1 मार्च रोजी तेल कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात 350.50 रुपयांनी, तर घरगुती गॅस सिलिंडर दरात 50 रुपयांनी वाढ केली होती. तत्पूर्वी, जानेवारीच्या सुरुवातीला व्यावसायिक गॅस सिलिंडर दरात 25 रुपयांची वाढ झाली होती. ताज्या कपातीनंतर देशाची राजधानी दिल्लीत व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दर 2 हजार 28 रुपयांवर आले असून, मुंबईत हेच दर 1,980 रु., कोलकाता येथे 2,132 रु., तर चेन्नई येथे 2,192.50 रुपयांवर आले आहेत.