छत्रपती संभाजीनगर दंगलीत जखमीचा मृत्यू; तपासासाठी ‘एसआयटी’

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : किराडपुरा येथे बुधवारी मध्यरात्रीनंतर उसळलेल्या दंगलीच्या चौकशीसाठी पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी सात अधिकार्यांसह दहा पोलिसांचे विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केलेे. दरम्यान, दंगल नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात जखमी झालेल्या एका दंगेखोराचा गुरुवारी रात्री मृत्यू झाला. शेख मुनीरुद्दीन शेख मोईनुद्दीन (वय 54, रा. किराडपुरा) असे त्याचे नाव आहे. शहरात अद्याप तणावपूर्ण वातावरण असून, परिस्थिती नियंत्रणात आहे.
वाहनाचा धक्का लागल्याच्या किरकोळ कारणावरून किराडपुरा येथील राम मंदिरासमोर दोन गटांत झालेल्या वादानंतर दंगल उसळली होती. दंगेखोरांनी तब्बल दोन तास पोलिसांवर दगडफेक करीत पेट्रोल बॉम्ब टाकून वाहनांची जाळपोळ केली. यात पोलिसांची तब्बल 16 वाहने आणि सीसीटीव्हीही खाक झाले.
दरम्यान, पहाटे तीनच्या सुमारास बंदोबस्तावर असलेल्या पोलिस निरीक्षक गीता बागवडे आणि अशोक भंडारे यांनी दंगल नियंत्रणात आणण्यासाठी जमावाच्या दिशेने गोळीबार केला. बागवडे यांनी सहा राऊंड, तर भंडारे यांनी पाच राऊंड फायर केले. त्यानंतर आक्रमक जमाव शांत झाला. याच गोळीबारात शेख मुनीरुद्दीन जखमी झाला होता. गुरुवारी रात्री त्याची प्रकृती खालावली, त्यातच त्याचा मृत्यू झाला. शुक्रवारी पहाटे अडीचच्या सुमारास न्यायाधीशांच्या उपस्थितीत घाटीत उत्तरीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर साडेपाच वाजता काली मशीद येथील कब्रस्तानात दफनविधी करण्यात आला. दंगलीत तब्बल तीन कोटींपेक्षा जास्त रकमेचे नुकसान झाले आहे.
गुन्हा दाखल असलेले आरोपी
पोलिस निरीक्षक अशोक भंडारे यांच्या फिर्यादीवरून जिन्सी ठाण्यात 400 ते 500 दंगेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल आहे. यात शौकत चाँद शहा, अरबा, रिजवान शेख पाशू, शेख मुनीरुद्दीन शेख मोईनुद्दीन, अल्ताफ फेरोज मौलाना, हाश्मी इत्तरवाले यांचा मुलगा आदींसह 400 ते 500 जणांचा आरोपींमध्ये समावेश आहे.
‘तो’ मृत्यू अपघाती
दंगलीतील एका जखमीचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिस रेकॉर्डवर आहे. मृताचा आरोपींमध्येही समावेश आहे. दरम्यान, आणखी एकजण मृत झाल्याची शहरात चर्चा आहे. मात्र, त्याचा अपघाती मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. समीर खान अजगर खान असे मृताचे नाव आहे. दिल्ली गेट येथे बेशुद्धावस्थेत त्याचा मृतदेह आढळला होता. याप्रकरणी घाटी चौकीत नोंद करण्यात आली आहे.
30 दंगेखोरांची ओळख पटली; आठजणांना अटक
किराडपुरा दंगल प्रकरणात शहर पोलिसांच्या वेगवेगळ्या पथकांनी शुक्रवारी दुपारपर्यंत आठजणांना अटक केली. आठही आरोपींना 3 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. पी. बेदरकर यांनी दिले.
बरकत शौकत शेख, शेख अतिक शेख हारुण, सद्दाम शहा बिस्मिल्ला शहा, शेख ख्वाजा शेख रशीद, शारेख खान इरफान खान, शेख सलीम शेख अजीज, सय्यद नूर सय्यद युसूफ, शेख नाजीम शेख अहेमद, अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
दंगेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची वेगवेगळी दहा पथके काम करीत आहेत. त्यांनी सीसीटीव्ही फुटेज, व्हिडीओवरून दंगेखोरांची ओळख पटविण्याचे काम हाती घेतले आहे. आतापर्यंत जवळपास 30 जणांची ओळख पटली असून, आठजणांना अटक करण्यात आली आहे.
दोन जमावांत पुन्हा तुफान दगडफेक
किराडपुरा येथील दंगलीची घटना ताजी असतानाच गुरुवारी ओव्हरगाव येथे फलक फाडल्याच्या कारणातून दोन गटांत वाद झाला. पोलिसांच्या मध्यस्थीने हा वाद निवळला. मात्र, शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास दोन्हीकडील जमाव समोरासमोर येताच वादाला तोंड फुटले आणि काही क्षणात तुफान दगडफेक करण्यात आली. यात दोन्हीकडील आठ ते नऊजण जखमी झाले. यात चार महिलांचा समावेश आहे.
अनिल बबन नलावडे (वय 31), शिवाजी कडुबा नलावडे (35), सविता शिवाजी नलावडे (30), भास्कर लिंबाजी पिटोरे (26), गोविंद रावसाहेब नलावडे (26), रावसाहेब काशीनाथ नलावडे (58), शबाना समद शेख (30), नसिफा अकबर पठाण (40, सर्व रा. ओव्हरगाव) हे जखमी आहेत. त्यांना घाटीत दाखल केले.
हर्सूल पोलिस ठाण्याच्या हद्दीत ओव्हरगाव आहे. सर्व समाजाचे लोक तेथे गुण्यागोविंदाने राहतात. गावातील धार्मिकस्थळे, शाळा, छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा एकाच परिसरात आहेत. गुरुवारी रात्री रामनवमीनिमित्त रॅली काढण्यात आली होती. ही रॅली तेथील टिपू सुलतान चौकातून जात असताना तणाव निर्माण झाला होता. हा वाद हर्सूल पोलिस ठाण्यापर्यंत गेला होता. मात्र, पोलिसांनी दोन्ही गटांना समजावून सांगत शांत केले होते. दरम्यान, शुक्रवारी झालेल्या राडा प्रकरणात हर्सूल पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिस निरीक्षक अमोल देवकर यांनी सांगितले.
कामावर जाणार्या तरुणाला मारहाण
गुरुवारी रात्री वाद झाल्यामुळे गावात तणावपूर्ण शांतता होती. शुक्रवारी सकाळी गावातील नियमित व्यवहार सुरळीत सुरू झाले होते. 8 ते 8.30 वाजण्याच्या सुमारास भास्कर लिंबाजी पिटोरे हा सेंट्रिंगच्या कामाला जात असताना गावातच दुसर्या गटाच्या टोळक्याने त्याला घेरले. त्यांनी पिटोरेला थेट मारहाण सुरू केली. याच वादाचे रूपांतर तुफान दगडफेकीत झाले.
एसआरपीएफ, दंगा काबू पथक दाखल
ओव्हरगाव येथील दगडफेकीची माहिती मिळाल्यावर पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी तत्काळ दंगल नियंत्रक पथक व राज्य राखीव पोलिस दलाची एक तुकडी तिकडे रवाना केली. पोलिस दाखल झाल्यानंतर परिस्थिती निवळली. गावात पोलिस बंदोबस्त कायम ठेवला आहे.