जगातील पहिलेच प्रकरण भारतात; माणसाला जडला झाडांचा आजार!

जगातील पहिलेच प्रकरण भारतात; माणसाला जडला झाडांचा आजार!

कोलकाता; वृत्तसंस्था :  माणसांना होणारे आजार, प्राण्यांना होणारे आजार आणि वनस्पतींवर पडणारे रोग हे सगळेच वेगवेगळे असतात. बरेचदा प्राण्यांमधील आजाराचा संसर्ग माणसांना होत असल्याचे स्वाईन फ्लू, कोरोना, सार्स आदींच्या माध्यमातून समोर आलेले आहे. वनस्पतींमधल्या रोगाचा थेट संसर्ग माणसात झाल्याची घटना मात्र आजवर जगाच्या पाठीवर कुठे घडली नव्हती. भारतात कोलकात्यात हा अपवादातील अपवाद घडला आहे. वनस्पती रोगाचा माणसात प्रादुर्भाव झाल्याची ही भारतातीलच नव्हे, तर जगातली पहिली घटना ठरली आहे.

रुग्ण 61 वर्षांचे असून, त्यांच्यात सुरुवातीला फ्लूची लक्षणे दिसली. सतत खोकला येत होता. आवाज बसलेला होता. थकवा जाणवत होता. घास गिळण्यातही त्रास होत होता. aतीन महिने असा त्रास सुरूच राहिला. अखेर त्यांना रुग्णालयाच दाखल करण्यात आले. सिटी स्कॅननंतर घशात पू झाल्याचे समोर आले. घशातल्या पूच्या तपासणीअंती कोन्ड्रोस्टिरियम पर्प्युरियम नावाच्या एका बुरशीचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले. ही बुरशी झाडांमध्ये सिल्व्हर लीफ नावाचा रोग पसरवते. ही बुरशी हवेत अगदी सूक्ष्म कणांच्या रूपात मिसळते आणि पसरते. ज्या झाडांच्या पानांवर हे कण पडतात, त्या झाडांच्या पानांचा रंग उडत जातो व नंतर ती वाळतात आणि गळतात.

मेडिकल मायकोलॉजी केस रिपोर्टस्मध्ये हे प्रकरण प्रसिद्ध करण्यात आले आहे. संबंधित व्यक्ती (रुग्ण) वनस्पतींवरच्या बुरशीवर संशोधन करणारी (प्लांट मायकोलॉजिस्ट) असून संशोधनादरम्यानच त्यांना हा संसर्ग झाला असावा, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

रुग्ण ठणठणीत

रुग्णाला 2 महिने अँटी फंगल औषधे देण्यात आली. घशातला पू काढण्यासाठी शस्त्रक्रिया करण्यात आली. आता हा संसर्ग संपूर्णपणे नाहीसा झाला आहे. रुग्ण ठणठणीत आहे.

फंगल इन्फेक्शन पुढे अधिक घातक ठरणार?

  • काही प्रकारच्या बुरशीपासून माणूस किंवा प्राण्यांना संसर्ग होऊ शकतो.
  • सगळ्या प्रकारची बुरशी हानिकारक नसली, तरी काही प्रजाती मात्र वनस्पतींसह माणूस व प्राण्यांसाठीही घातक ठरू शकतात.
  • पर्यावरण बदलामुळे बुरशीमध्ये बदल होत आहेत. त्यांच्यावर औषधांचा परिणामही कमी होत आहे.
  • पर्यावरण बदलांचा बुरशीतील बदल अभ्यासणे कळीचा मुद्दा बनले आहे.
  • रुग्णाच्या पूचा नमुना जागतिक आरोग्य संघटनेकडे पाठवण्यात आला आहे.

वेळेवर निदान झाले नसते व उपचार मिळाले नसते, तर श्वसनलिकेला संसर्ग झाला असता व जीव धोक्यात आला असता.
– रुग्णावर उपचार करणारे डॉक्टर

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news