रामनवमी विशेष : अयोध्येतील श्रीराम मंदिर दिवाळीत भाविकांसाठी खुले होणार | पुढारी

रामनवमी विशेष : अयोध्येतील श्रीराम मंदिर दिवाळीत भाविकांसाठी खुले होणार

अयोध्येत रामजन्मभूमी मंदिराचे बांधकाम वेगाने सुरू आहे. आतापर्यंत सुमारे 50 टक्के बांधकाम पूर्ण झाले आहे. गर्भगृहाच्या भिंतींचे काम पूर्ण झाले असून, पहिल्या मजल्याचे बांधकाम ऑक्टोबर 2023 पर्यंत पूर्ण होईल. श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्राचे सरचिटणीस चंपत राय यांनी सांगितले की, मंदिराचे बांधकाम समाधानकारक गतीने सुरू आहे. आमचे कारागीर रात्रंदिवस काम करत आहेत. राम मंदिराचा पहिला टप्पा ऑक्टोबर 2023 पर्यंत पूर्ण होईल आणि राम मंदिर दिवाळीच्या सुमारास भाविकांसाठी खुले केले जाईल. प्राणप्रतिष्ठा 1 ते 14 जानेवारी 2024 दरम्यान कधीही होऊ शकते.

 

1949 : रामलल्लाची मूर्ती वादग्रस्त मशिदीत स्थापित करण्यात आली. त्यानंतर दोन्ही पक्षांनी न्यायालयात दिवाणी दावा दाखल केला. केंद्र सरकारने प्रवेशद्वार बंद केले आणि वास्तू वादग्रस्त घोषित केली.
1984 : अयोध्येतील श्री राम जन्मभूमी स्थळावरच मंदिर उभारणीच्या आंदोलनाला सुरुवात झाली.
1989 : विश्व हिंदू परिषदेने वादग्रस्त ठिकाणी शिलान्यास केला. येथूनच विहिंपच्या ‘मंदिर वहीं बनाएंगे’ आंदोलनाला सुरुवात झाली.
1990 : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष लालकृष्ण अडवाणी यांनी ‘मंदिर वहीं बनाएंगे’चा नारा देत देशभर रथयात्रा काढली. पंतप्रधान चंद्रशेखर यांनी या मुद्द्यावर चर्चा करण्याचे प्रयत्न केले. परंतु ते व्यर्थ ठरले.
1992 : कारसेवकांनी 6 डिसेंबर रोजी वादग्रस्त वास्तू जमीनदोस्त केली. संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी पंतप्रधान नरसिंह राव यांनी न्या. लिबरहान यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली.
2002 : संबंधित वास्तूची मालकी कोणाची या मुद्द्यावर अलाहाबाद उच्च न्यायालयात सुनावणी सुरू झाली.
2003 : भारतीय पुरातत्त्व विभागाने श्रीरामाचे मंदिर घुमटाच्या खालील बाजूस असल्याचे साधार स्पष्ट केले. या विषयीचे संपूर्ण तथ्य न्यायालयासमोर मांडले.
2010 : मशिदीच्या मध्यभागी असलेल्या घुमटाखाली प्रभू श्रीराम यांचा जन्म झाला होता, असा निकाल अलाहाबाद न्यायालयाने दिला.
2020 : श्रीराम मंदिराचा शिलान्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 5 ऑगस्ट रोजी पार पडला. त्यांनी प्रातिनिधिक 9 शिलांचे पूजन केले आणि 25 हजार कोटींच्या विकासकामांना सुरुवात झाली.
2023 : दिवाळीच्या सुमारास श्रीराम मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले होण्याचे संकेत आहेत.

 

Back to top button