

पुढारी वृत्तसेवा, नवी दिल्ली : राजद नेते लालूप्रसाद यादव (lalu prasad yadav) यांना देण्यात आलेल्या जामिनाविरोधात सीबीआयने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. चारा घोटाळ्याप्रकरणी झारखंड उच्च न्यायालयाने यादव यांना जामीन दिला होता. सीबीआयच्या ताज्या याचिकेमुळे यादव यांच्यासमोरील वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
अशाच प्रकारच्या याचिकेसोबत ही याचिका संबद्ध करून घेतली जात असून लालू यादव यांना नोटीस दिली जाणार नाही, असे न्यायमूर्ती अजय रस्तोगी आणि न्यायमूर्ती बेला त्रिवेदी यांच्या खंडपीठाने सुनावणीदरम्यान स्पष्ट केले. सरकारी पक्षाकडून अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एस. व्ही. राजू यांनी यादव यांच्याविरोधात नोटीस जारी करावी, अशी विनंती केली होती. यादव यांच्या जामिनाला विरोध करत याआधीही सीबीआयने याचिका दाखल केली होती. चारा घोटाळा प्रकरणात गतवर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात यादव (lalu prasad yadav) यांच्याविरोधातील आरोप सिद्ध झाले होते. यादव यांना सहा वर्षांच्या तुरुंगवासाबरोबरच 60 लाख रुपयांचा दंड झारखंड न्यायालयाने ठोठावला होता. त्यानंतर आजारपणाच्या कारणास्तव जामीन प्राप्त करण्यात त्यांना यश आले होते.