

न्यायालयाने शिक्षा ठोठावल्यावर सभागृहाचे सदस्यत्व गमवाव्या लागणार्या नेत्यांच्या यादीत आता राहुल गांधींचा समावेश झाला आहे. याआधी कोणत्या नेत्यांचे सदस्यत्व रद्द झाले त्यावर एक नजर…
कोट्यवधी रुपयांच्या चारा घोटाळ्यात दोषी आढळलेल्या नेत्यांत राजदचे प्रमुख, माजी रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांच्यावर अनेक एफआयआर नोंदवले गेले. 3 ऑक्टोबर 2013 रोजी रांची येथील सीबीआय न्यायालयाने दोषी ठरवले. दोषी ठरवताच त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले.
समाजवादी पक्षाचे दिग्गज नेते आझम खान यांच्यावर किमान डझनभर खटले सुरू होते. त्यात अनेक निकालांत त्यांना दोषी ठरवण्यात आले; पण 2019 मध्ये केलेल्या एका हेट स्पीच प्रकरणात त्यांना न्यायालयाने 27 ऑक्टोबर 2022 रोजी दोषी ठरवत तीन वर्षांची शिक्षा सुनावली. पाठोपाठ उत्तर प्रदेश विधानसभा सचिवालयाने त्यांचे सदस्यत्व रद्द केले.
2013 मध्ये मुझफ्फरनगरमध्ये झालेल्या दंगल प्रकरणात भाजपचे आमदार विक्रम सैनी दोषी आढळले व त्यांना 2022 मध्ये दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. त्यांचे विधानसभा सदस्यत्व तातडीने रद्द करण्यात आले.
लक्षद्वीपचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार मोहम्मद फैजल यांना लक्षद्वीपच्या सत्र न्यायालयाने खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी यावर्षी 13 जानेवारी रोजी दोषी ठरवले. लगेच त्यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आले; नंतर केरळ उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिली.