Rahul Gandhi : घर देता का घर! राहुल गांधींच्या डोक्यावरचे ‘सरकारी’ छतही जाणार | पुढारी

Rahul Gandhi : घर देता का घर! राहुल गांधींच्या डोक्यावरचे ‘सरकारी’ छतही जाणार

पुढारी ऑनलाईन डेस्क : ‘मोदी’ आडनावावरून अवमानकारक टिप्पणी केल्याच्या प्रकरणात सूरतच्या न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावलेले काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द झाले आहे. लोकसभा सचिवालयाने याबाबतचा आदेश जारी केला आहे. अशातच आता आणखीएक मोठी अपडेट समोर येत आहे. संसद सदस्यत्व रद्द केल्यानंतर आता राहुल गांधींना दिल्लीतील राहता सरकारी बंगला रिकामा करावा लागणार का? जर तसे झाले तर ते कुठे राहतील? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

राहुल गांधी (Rahul Gandhi) हे केरळमधील वायनाड लोकसभा मतदार संघाचे खासदार होते. भारत जोडो यात्रेच्या समापन कार्यक्रमात त्यांनी आपल्या नावावर स्वत:चे घर नसल्याचे जाहीर केले होते. ते म्हणाले होते की, माझे स्वतःचे घर कधीच नव्हते. त्याच जाणिवेमुळे मला भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून लोकांशी जोडण्यास मदत झाली.’

काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत नेत्यांना राहण्यासाठी आणि राहण्यासाठी कंटेनरमध्ये घरासारख्या केबिन बनवल्या होत्या. मिळालेल्या माहितीनुसार, राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि सोनिया गांधी यांचे स्वतःचे घर नाही.

सरकारी बंगला रिकामा करावा लागेल का?

गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयाच्या अंतर्गत येणारे डायरेक्टोरेट ऑफ स्टेट्स केंद्रीय मंत्री आणि खासदारांना सरकारी बंगले देते. खासदारांना जनरल पूल रेसिडेंन्शिअल अकॉमोडेशन कायद्यांतर्गत सरकारी बंगले दिले जातात. राहुल गांधींचे संसद सदस्यत्व संपल्यानंतर आता त्यांना नियमानुसार सरकारी बंगला रिकामा करावा लागणार आहे. मात्र, त्यापूर्वी त्यांना केंद्र सरकारच्या इस्टेट ऑफिसरकडून नोटीस बजावण्यात येणार आहे. त्यावर त्यांना तीन दिवसांत उत्तर द्यावे लागेल.

Back to top button