Rahul Gandhi | खासदारकी रद्द झाल्यानंतर राहुल गांधींची दोन वाक्यांत प्रतिक्रिया, म्हणाले, ‘भारताच्या आवाजासाठी लढतोय’ | पुढारी

Rahul Gandhi | खासदारकी रद्द झाल्यानंतर राहुल गांधींची दोन वाक्यांत प्रतिक्रिया, म्हणाले, 'भारताच्या आवाजासाठी लढतोय'

नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन; ‘मोदी’ आडनावावरून अवमानकारक टिप्पणी केल्याच्या प्रकरणात सूरतच्या न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावलेले काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Congress leader Rahul Gandhi) यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द झाले आहे. लोकसभा सचिवालयाने याबाबतचा आदेश जारी केला आहे. स्वतः राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षासाठी हा जबर धक्का मानला जात आहे. (Rahul Gandhi defamation case) या कारवाईनंतर राहुल गांधी यांनी ट्विट करत त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. ”मी भारताच्या आवाजासाठी लढत आहे. मी त्यासाठी कोणतीही किंमत चुकवायला तयार आहे.” असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे.

राहुल गांधींना अपात्र ठरवल्याने काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. हा तर लोकशाहीवर हल्ला असल्याची प्रतिक्रिया काँग्रेस नेत्यांनी दिली आहे. मोदी सरकार राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाला घाबरले आहे. त्यामुळेच सरकारने राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्त्व रद्द केले असल्याची टीका काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी दिली आहे.

ज्या दिवशी राहुल गांधी यांना दोषी सिद्ध करण्यात आले, त्या दिवसापासून म्हणजे २३ मार्चपासून अपात्रतेचा निर्णय लागू होईल, असे लोकसभा सचिवालयाने स्पष्ट केले आहे. अपात्र ठरण्यापूर्वी गांधी हे केरळमधील वायनाड मतदारसंघाचे खासदार होते. वर्ष २०१९ मध्ये गांधी यांनी ‘मोदी’ आडनावाच्या अनुषंगाने वादग्रस्त विधान केले होते. त्यानंतर त्यांच्याविरोधात गुजरातमध्ये अवमानना खटला दाखल करण्यात आला होता. सूरत येथील न्यायालयाने गांधी यांना या प्रकरणात दोषी ठरवत दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. वरच्या न्यायालयात अपील करण्यासाठी शिक्षेला एक महिन्याची स्थगिती देण्याबरोबरच गांधी (Congress leader Rahul Gandhi) यांना सूरतच्या न्यायालयाने जामीनही दिला आहे.

काय म्हणाले होते गांधी?

कर्नाटकमधील कोलार येथे १३ एप्रिल २०१९ रोजी निवडणूक प्रचार सभेत बोलताना गांधी यांनी ‘मोदी’ आडनावाच्या संदर्भात वादग्रस्त वक्तव्य केले होते. ”नीरव मोदी, ललित मोदी, नरेंद्र मोदी यामध्ये आडनाव समान आहे? सर्व चोरांचे आडनाव मोदी असते का?’ असे ते वक्तव्य होते. गांधी यांच्या या वक्तव्याला आक्षेप घेत भाजपचे आमदार पूर्णेश मोदी यांनी त्यांच्याविरोधात अवमानना खटला दाखल केला होता. गांधी यांनी आपल्या वक्तव्याद्वारे संपूर्ण मोदी समाज चोर असल्याचे सांगत या समाजाचा अपमान केला असल्याचे पूर्णेश मोदी यांनी याचिकेत म्हटले होते.

हे ही वाचा :

Back to top button