श्रवणबेळगोळचे चारुकीर्ती स्वामी यांचे देहावसान | पुढारी

श्रवणबेळगोळचे चारुकीर्ती स्वामी यांचे देहावसान

बंगळूर; पुढारी वृत्तसेवा : श्रवणबेळगोळ येथील जैन मठाचे चारुकीर्ती भट्टारक स्वामी (वय 74) यांचे गुरुवारी देहावसान झाले. हृदयविकाराने त्यांचे देहावसान झाल्याचे मठाच्या सूत्रांकडून सांगण्यात आलेे.

3 मे 1949 रोजी वारंगा येथे जन्मलेल्या स्वामींनी वयाच्या विसाव्या वर्षी दीक्षा घेतली व एकविसाव्या वर्षी भट्टारक पीठावर विराजमान झाले. लहानपणापासून त्यांचा कल जैन त त्त्वज्ञानाकडे होता. त्यांनी प्राकृत, संस्कृत व कन्नड भाषेतून जैन तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला होता. तत्त्वज्ञान व इतिहासात त्यांनी म्हैसूर व बंगळूर विद्यापीठातून एम.ए. केले होते. इंग्रजी व हिंदीवरही त्यांचे प्रभुत्व होते.

चारुकीर्ती भट्टारक स्वामींनी भट्टारक म्हणून आपल्या 53 वर्षांच्या कार्यकाळात चारवेळा महामस्तकाभिषेकाचे नेतृत्व केले. अनेक शाळा, अभियांत्रिकी कॉलेज, पॉलिटेक्निक, 2 सुसज्ज इस्पितळे तसेच प्राकृत भाषेच्या संवर्धनासाठी विद्यापीठ स्थापन केले. भक्तनिवास, भोजनशाळा निर्माण केल्या. 1981 साली भगवान महावीर यांच्या निर्वाणाच्या 2500 व्या जयंतीनिमित्त तसेच पहिल्या मस्तकाभिषेकाच्या 1000 व्या जयंतीनिमित्त देशभर धर्मचक्र यात्रेचे आयोजन केले. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी महामस्तकाभिषेक सोहळ्याला उपस्थित राहिल्या. त्यावेळी त्यांनी स्वामींना ‘कर्मयोगी’ पुरस्कार दिला होता.

जैन धर्मातील धवल, महाधवल व जयधवल या महाग्रंथांच्या 40 खंडांचे त्यांनी मूळ प्राकृत भाषेतून कन्नड भाषेत अनुवाद करून घेतला. या प्रकल्पासाठी 100 हून अधिक तज्ज्ञ 10 वर्षे झटत होते. स्वामी उत्तम वक्ते होते. युरोपसह अमेरिका, केनिया, इंग्लंड अशा अनेक देशांत त्यांना निमंत्रित करण्यात आले होते. तेथे त्यांनी जैन धर्मविषयक प्रवचने दिली.

बेळगावशी संबंध

बेळगावशी त्यांचा संबंध खूप जुना आहे. 2019 साली दक्षिण महाराष्ट्र व उत्तर कर्नाटकात आलेल्या प्रलयंकारी पुरावेळी त्यांनी आयुष्यात पहिल्यांदा चातुर्मासाचे व्रत मोडले व या काळात प्रवास केला. तब्ब्ल एक आठवडा त्यांनी बेळगाव, अथणी, उगार, सांगली, हुक्केरी या भागातील शेकडो गावांना भेटी दिल्या. तेथील पूरग्रस्तांना धीर दिला. हजारो जीवनोपयोगी साहित्याच्या किटचे वाटप केले. 2019 साली आचार्य शांतिसागर महाराजांच्या दीक्षा महोत्सवाच्या निमित्ताने हुक्केरी तालुक्यातील यरनाळ येथे भव्य शांती स्मारक उभारावे व तेथे वर्षभर कार्यक्रम व्हावेत, त्यांची कल्पना तडीस गेली. त्यांच्या जाण्याने जैन समाजच नव्हे, तर अवघा देश एका प्रगल्भ, विद्वान गुरूला मुकला आहे.

Back to top button